काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांची दूरावस्था झाली : भाई मुंढे 

म्हसवड ः विकासाची खोटी स्वप्ने दाखवून गेली 60 वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली असून काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांची दूरावस्था झाली आहे. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ काँग्रेसमुळेच आली आहे. मात्र भाजपाने शेतकर्‍यांच्या वेदना जाणून सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजपाचेच उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन किसान मोर्चार्चे राष्ट्रीय अध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंढे यांनी जांभुळणी, ता. माण येथील सभेत केले.
जांभुळणी येथे आयोजित भाजप नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या सत्काराचे कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव शिंदे, जि. प. सदस्या सौ. सुवर्णा देसाई, प्रा. विश्‍वंभर बाबर, डॉ. महादेव कापसे, भाजपा माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे, भाजपाचे विस्तारक बंडू जायभाय, धिरज दवे, निलकंठ जोशी व अनेक पदाधिकारी, जांभुळणी गावचे नूतन सरपंच व सदस्य उपस्थित होते.
यावेळी भाई मुंढे पुढे म्हणाले, जगात सर्वात मोठा पक्षप म्हणून भाजपचा उल्लेख आहे. 11 कोटी सदस्य या पक्षात आहे. सर्वाधिक राज्यात भाजपाची सत्ता आहे. भाजपाने सत्तेवर  आल्यावर अनेक मोठी विकासकामे सुरू केली असून ना. नितीन गडकरी यांनी भारतातील सर्वच राष्ट्रीय व राज्य मार्गाची मोठी कामे सुरू केली असून माण तालुक्यातून 2 राष्ट्रीय मार्गाचे सध्या काम सुरू आहे. जलसंधारण व शेती विकास यावर अधिक भर दिला आहे. मागेल त्यास शेततळे, प्रत्येक शेतात विहीर, मृदपरीक्षण करुन मोफत मार्गदर्शन इत्यादी कामे सुरू केली आहेत. तर आगामी काळात प्रत्येक ज्येष्ठ शेतकर्‍याला दरमहा पेन्शन देण्याची योजना शासन करणार असून शेतकर्‍यांवर यापुढे आत्महत्या करण्याची कधीच वेळ येणार नाही असे धोरण महाराष्ट्र शासनाने तयार केले असून माण तालुक्यातील सर्व दुष्काळी गावाला आवश्यक असणार्‍या विकासाच्या योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फंडातून लवकर पूर्ण करण्यात येतील. पण आता यापुढे तुम्ही पुन्हा काँग्रेसला निवडून देण्याचे पाप करु नका. शेतातील सर्व कामे शासनाने रोजगार हमी योजनेतून करण्याची आमची किसान संघटनेची शासनाकडे मागणी आहे असेही भाई मुंढे यावेळी म्हणाले. माळरानात कमळ फुलविणारे अनिल देसाई यांच्या पाठीशी सर्वांनी राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अनिल देसाई म्हणाले, आमच्या तालुक्यातील दुष्काळी 16 गावांना पाणी मिळावे यासाठी मी गेली 20 वर्षे संघर्ष केला. या संघर्षाला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून 16 गावांच्या पाणी योजनेसाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून मदत व पुनर्वसन खात्यातून ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी या खर्चास मंजुरी दिली असून 40 वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादीने जे केले नाही ते भाजपाने एक वर्षात करुन दाखविले आहे. सातारा-पंढरपूर हा रस्ता राज्यमार्ग होता त्याचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण केले आहे. बारामती-विटा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे. महाबळेश्‍वरवाडी तलाव वर्षातून दोन वेळा भरण्यासाठी 64 कोटी 72 लाख रुपये खर्चाच्या योजनेस विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. आम्ही भाजपा पक्षात कोणही वैयक्तिक लाभाची अपेक्षा ठेवून आलो नाही तर येथील दुष्काळी शेतकर्‍याला बारामाही पाणी उपलब्ध व्हावे तरच इथला विकास होणार आहे.
आगामी काळात माणचा आमदार हा भाजपा पक्षाचाच असेल अशी खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली. सध्याच्या आमदारांनी या भागातील रस्त्यांच्या विकासकामाला आडकाठी करुन या परिसरातील विकास थांबवला आहे. पण आता भाजपा सरकार माझ्या पाठीशी आहे. या भागातील सर्व विकासकामे येत्या काळा पूर्ण होतील असेही ते म्हणाले. जिहे-कटापूर, उरमोडी ही कामेही भाजपाने मार्गी लावली असून 800 कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने प्राथमिक मंजुरी दिली आहे. भोजलिंग मंदीर व डोंगर विकास यासाठी 11 लाख रुपये नुकतेच मंजूर झाले आहेत. जांभुळणी रस्त्यासाठी 45 लाख रुपये मंजूर झाले आहेत. यावेळी शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्‍वंभर बाबर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जांभुळणी येथील सरपंच सौ. प्रियांका काळे, सौ. शोभा काळे, पोलीस पाटील सुभाष काळेल, डॉ. विजय कुलकर्णी, दत्तात्रय आटपाडकर, जोतीराम जाधव, विलास काळे, नितीन शिंदे, महेश लिंगे, शंकर देवकुळे (पळशी), शंकर गंबरे,  जालिंदर खरात, विठ्ठल गायकवाड, मन्सूर मुल्ला, रफीक मुलाणी, युवराज काळे, कैलास काळेल, शिवाजी पोळ या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार भाई मुंढे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी ओबीसी मोर्चाचे विजय टाकणे, अमृत चौगुले, दादा शिंदे, अविनाश मासाळ, सुभाष वीरकर, सचिन होनमाने, संदीप भोसले, धीरज दवे, भास्कर काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक जालिंदर खरात यांनी केले. आभार काळेल यांनी मानले. शहाजी काळेल, भास्कर काळे, पिंटू काळेल, युवराज काळेल व इतर ग्रामस्थ यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
मार्डी विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक शिवाजी पोळ यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. थोड्याच दिवसात मार्डी येथे कार्यक्रम घेवून मंत्र्यांच्या उपस्थित अन्य कार्यकर्त्यांना प्रवेश देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.