कोळकी गाव जिल्ह्यात रोल मॉडेल बनवा :  संजीवराजे नाईक निंबाळकर 

फलटणः  घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या मनात स्वच्छतेची भावना जोपासली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरातुनच ओला व सुक्या कचर्‍याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सुरक्षिततेचा प्रश्नही महत्वपूर्ण असून सी सी टिव्ही बसविणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
कोळकी ता. फलटण येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प भेट व सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित केलेल्या गावातील व्यापार्‍याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सरपंच सौ.रेश्मा देशमुख, माजी सरपंच व ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, उपसरपंच वैभव नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घनकचरा निर्मूलनाबाबतीत मार्गदर्शन करताना कोळकीत सुरु असलेल्या घंटा गाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा यांचे विभाजन करण्यात यावे अशी सुचना करुन संजीवराजे म्हणाले ग्रामपंचायतीने घेतलेला प्लॅस्टीक बंदीचा निर्णय हा अतिशय स्तुत्य असून इतर ग्रामपंचायतींही हा निर्णय घेणे गरजेचे आहे.
कोळकी परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी गेली अनेक दिवस व्यापारी व ग्रामस्थ करीत होते. ही मागणी कोळकी ग्रामपंचायतीने पूर्णत्वास नेण्याचे ठरविले असून व्यापार्‍यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून कोळकी गावात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लवकरच बसविण्यात येतील असा विश्वासही संजीवराजे यांनी यावेळी व्यक्त केला. फलटण शहरात बसवलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे हे व्यापारी व सार्वजनिक संस्थांच्या मदतीने बसवण्यात आलेले आहेत, त्याच धर्तीवर कोळकीतील व्यापार्‍यांनीही सी.सी.टी.व्ही. बसविण्यासाठी ग्रामपंचायतीस मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गावात नव्याने सुरु होत असलेले प्रकल्प लवकरात लवकर पुर्णत्वाला नेऊन कोळकी हे गाव जिल्ह्यात रोल मॉडेल बनवावे असे आवाहनही यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थितांना केले.
या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत म्हणाले, नुसते सी.सी.टी.व्ही. लावून चालणार नाही. त्याचे नियंत्रणही महत्त्वाचे आहे. सी.सी.टी.व्ही.मुळे भुरट्या चोरट्यांवर वचक बसतो हे तंतोतंत खरे आहे. कोळकी परिसरात सी.सी.टी.व्ही. बसवल्यावर शहराप्रमाणेच कोळकीवरही पोलीस प्रशासनाचा वॉच राहील. कोळकीमध्ये बर्‍याच प्रमाणात परप्रांतीय वास्तव्यास आहेत. परप्रांतीय हे त्यांच्या भागातील सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाडेकरु म्हणून ठेवलेल्या परप्रांतीयांची माहिती घरमालकांनी पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे. जर ती दिली गेली नाही तर प्रसंगी घरमालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला.
कोळकीतील विविध प्रकल्प आता पूर्ण होत आले आहेत. घरातील प्रत्येकाने ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये टाकला तर वर्गीकरण करण्यास सगळ्यांचा सोपे जाईल. गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये निर्मिती झालेले खत हे आसपासच्या शेतकर्‍याना प्राधान्याने रास्त भावात दिले जाईल असे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी प्रास्तविकामध्ये स्पष्ट केले.
कार्यक्रमात माण्यवरांचे स्वागत सरपंच रेश्मा देशमुख व उपसरपंच वैभव नाळे यांनी केले. आभार ग्रामविकास आधिकारी एन. एच. निंबाळकर यांनी मानले.        कार्यक्रमास गावातील व्यापारी, लघु  व्यावसायीक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.