वाई : संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजवणार्या बोगस डॉक्टर संतोष पोळ याने बेपत्ता असणार्या मंगल जेधे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखा व वाई पोलीस ठाण्याचे अधिकार्यांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत संतोष पोळनेच वाई तालुक्यातून व जिल्ह्यातून बेपत्ता असणार्या महिलांचा खून केल्याचा कयास बांधला होता. आज तो कयास प्रत्यक्षात आल्याने व डॉ. पोळच्या फार्म हाऊसवर तीन महिलांचे व एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये सलमा शेख, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे, नथमल भंडारी व धोम धरणात फेकून दिलेल्या वनिता गायकवाड अशी नावे निष्पन्न झाली आहेत. हे सर्व लोक संतोष पोळच्या संपर्कात होते व 2003 पासून बेपत्ता आहेत.
अंगणवाडी सेविका व पूर्वप्राथमिक शिक्षिका संघाच्या राज्याध्यक्षा मंगल भिकू जेधे (वय 49, रा. वेलंग) या गुढरित्या सुमारे तीन महिन्यापासून बेपत्ता होत्या. त्यांना शोधण्याचे पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले होते. परंतु त्यांनी बोगस डॉक्टर संतोष पोळ याला केलेला शेवटच्या कॉलच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत डॉ. पोळ याच्यावरच तपास केंद्रीत केला.
पोळ याची प्रेयसी ज्योती मांढरे हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच संतोष पोळनेच मंगल जेधेंचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोळ याने जेधे यांचा खून करुन मृतदेह घराच्या जवळ असणार्या पोल्ट्रीच्या बाजूलाच खड्डा खोदून पुरुन टाकला होता. यानंतर जेधे याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. पद्माकर घनवट यांनी पोळ याच्याकडे कसून चौकशी केली असता बेपत्ता असणार्या महिलांचेही खून केलेअसल्याचे कबूल केले.
आज दि.15 ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी मंगल जेधेंचा मृतदेह सापडला होता त्याच्या बाजूलाच तीन महिलांचे व एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान अजून एक मृतदेह धोम जलाशयात टाकल्याची माहिती संतोष पोळने दिली असून त्याचाही शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची घटना घडल्यामुळे संपूर्ण जिल्हाचा हादरुन गेला आहे. अतिशय थंड डोक्याने हे सर्व खून केल्यामुळे संतोष पोळ हा क्रूरकर्मा असल्याची प्रचिती आली आहे. दरम्यान याबाबत मोठ्या प्रमाणावर किडनी रॅकेट कार्यरत असल्याबाबतची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली असून सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तसेच संतोष पोळने अजून काही खून केले आहेत का याबाबतही तपास सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणात डॉ. घोटवडेकर यांचा काय सहभाग आहे का याची पडताळणी पोलिसांमार्फत केली जात असून याबाबत पोलिसांनी जास्त काही बोलण्यास नकार दिला.