पाटण : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटण तालुक्यातील किल्ले सुंदरगडावर (घेरा दातेगड) शनिवार दि. 11 व रविवार 12 रोजी महाराष्ट्रातील चौथे दुर्ग संमेलन होत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली दुर्ग संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा संमेलनात 14 हून अधिक शिवव्याख्याते, दुर्गप्रेमी, इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शस्त्रास्त्र प्रदर्शन, शस्त्रास्त्र प्रात्यक्षिक प्रशिक्षण, शाहिरी कार्यक्रम, आतषबाजी अशा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ दुर्गप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष सुदामदादा गायकवाड व चंद्रहार तथा बकाजी निकम यांनी केले आहे.
या चौथ्या दुर्ग संमेलनाचे स्वागताध्य श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर हे असून संमेलनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थान यांच्या हस्ते होत आहे. यात इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडूरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, राज्यातील महान शास्त्रज्ञ संग्राहक गिरीषराव जाधव, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील, प्रा. कुलदीप देसाई, डॉ. संदीप महिंद गुरूजी, दुर्ग संवर्धनाची चळवळ बळकट करणारे श्रमिक गोजमगुंडे, अमरसिंहराजे जाधवराव, शिवरायांच्या दक्षिणदिग्विजयाचे अभ्यासक अनिकेत यादव, शस्त्रास्त्र संग्राहक विक्रमसिंह पाटील, छत्रपती शाहूमहाराज यांच्या जीवनचरित्रावर विशेष अभ्यास करणारे अजय जाधव, नितीन भाडळे आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. 11 रोजी टोळेवाडी गावातून शोभा यात्रा काढून किल्लेदाते गडावर उद्घाटन होताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, सीईओ डॉ. कैलास शिंदे उपस्थित असणार आहेत. पहिल्या दिवशी प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते दुर्गपूजन, धारेश्वरचे निलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन होत आहे. सकाळी 11.30 ते 2.30 पर्यंत उद्घाटन सत्र झाल्यानंतर व्याख्यानासोबत शस्त्रास्त्र प्रदर्शन, प्रशिक्षण होणार आहे.
सायंकाळच्या सत्रात व्याख्यानांना प्रोजेक्टरची साथ. महाराष्ट्रातील अन्य गडकिल्ल्यांवर उभे राहिलेले काम तसेच शिवकाळातील प्रत्यक्ष दाखल्यांसह सायंकाळ रंगणार आहे. रात्रीला विख्यात शाहीर देवानंद माळी व बालशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पोवाडा, दांडपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळ व मध्यरात्री मशाल प्रज्वलनाबरोबरच आतषबाजी होणार आहे.
संमेलनाच्या दुसर्या दिवशीच्या सत्रात दुर्ग चढणे, सूर्य नमस्कार, घोषणा गारद या स्पर्धा होणार आहे. विविध व्याख्यानांनी दुपारचे तिसरे सत्र भोजन होईल व संमेलन सांगतेकडे वळेल. यात प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे महाराष्ट्रातले शिवतांडव या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दुपारी3 वाजता रणजितसिंह मोहिते पाटील अकलूज व विक्रमसिंह पाटणकर सरकार यांच्या उपस्थित दुर्ग संमेलनाचा समारोप होणार आहे. चौथे दुर्ग संमेलन मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी तालुक्यातील शिवभक्त व दुर्गप्रेमींकडून परिश्रम घेतले जात आहे.
किल्ले सुंदरगडावर शनिवारी व रविवारी दुर्ग संमेलनानिमित्त भरगच्च कार्यक्रम
RELATED ARTICLES