औंध : औंध संस्थानचा, सर्वांचा लाडक्या गजराजाला निरोप देऊन दोन दिवस झाले तरी ही लाडक्या गजराज ऊर्फ मोतीची आठवण अजूनही औंधकरांच्या मनातून जात नसून आपला लाडका मोती कुठपर्यंत पोहचला आहे. त्याचा प्रवास कसा सुरू आहे याची हुरहुर प्रत्येकास लागली आहे.
बुधवारी सायंकाळी चार वाजता औंधच्या गजराजाला ह्रदय हेलावून टाकणार्या वातावरणात औंध ग्रामस्थांनी भरलेल्या मनांनी हजारोंच्या उपस्थितीत निरोप दिला. त्याअगोदर औंध गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी त्याचे दर्शन घेतले.त्यानंतर त्यास वाईल्डलाईफच्या व्हँन बसण्यासाठी नेले पण त्याठिकाणी तीन तास गजराजाने प्रशासकीय यंत्रणेस झुलवत ठेवले.त्यामुळे आपला गजराज जाणार की राहणार अशी चर्चा उपस्थित हजारो नागरिक, महिला, युवकांमध्ये सुरू झाली .पण त्यानंतर सरकारी मळयात नेऊन खुल्या ट्रकमध्ये बसवून बुधवारी सायंकाळी गजराजाला सातारपर्यंत नेऊन त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता वाईल्डलाईफच्या गाडीत त्यास बसविण्यात आले व पुढे मथुरेकडे त्याची रवानगी करण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून गजराजाचा प्रवास सुरु असून दिवसभर प्रवास व रात्री मुक्काम असा हा प्रवास सुरु असून मथुरेचे सरासरी बावीशे किमीचे अंतर पार करण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागणार आहेत.
चौकट..एक..
औंध येथून गजराज जाऊन तीन दिवस झाले तरी त्याच्या मागील पन्नास वर्षातील आठवणींची चर्चा औंधसह परिसरात सुरू आहे.
चौकट दोन
औंधमधून हत्ती मथुरेला पोहचण्याअगोदरच पेटा या संघटनेने औंधच्या गजराजाच्या उपचारासाठी आपल्या वेबसाईटवर मदतीचे आव्हान सुरू केल्याने पेटाच्या या भूमिकेबाबत औंधकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मिडिया मध्ये युवक,ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.