* सात गावातील वायरमन पदे रिक्त
* नूतन अधिकार्यांनी त्वरित कारवाई करावी
* औंधसह तेरा गावांमध्ये आठ हजार वीज कनेक्शन
* तीन वायरमन व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
औंध-औंध वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या तेरा गावांपैकी सात गावांमधील वायरमनची पदे रिक्त
असून अनेक पदे रिक्त असल्याने शेतकरी, ग्रामस्थांना स्वताचा जीव धोक्यात घालून अनेक ठिकाणी शेतातील ,घरातील वीज दुरूस्तीची कामे स्वताचा जीव धोक्यात घालून करावी लागत आहेत. त्यामुळे नूतन पदभार स्वीकारलेले अधिकारी तरी कामात सूसुत्रता आणणार की पहिले पाढे पंचावन्न सुरूच राहणार हा प्रश्न यानिमित्ताने शेतकरी, ग्रामस्थ वर्गातून उपस्थित केला जात आहे .
याबाबतची अधिक माहिती अशी, औंध वीज वितरण कार्यालयातंर्गत औंधसह कोकराळे, अंभेरी, भोसरे,जायगाव, खबालवाडी, त्रिमली,गणेशवाडी, करांडेवाडी, येळीव, गोपूज,नांदोशी,लांडेवाडी ही तेरा गावे येतात. पण मागील काही वर्षांमध्ये अकरा वायरमन पदांपैकी जवळजवळ सात वायरमन पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे गोपूज, अंभेरी, कोकराळे,येळीव, गणेशवाडी, खबालवाडी, करांडेवाडी यागावांमधील वायरमनची पदे रिक्त आहेत. सध्या औंध येथील तीन वायरमनवरच सर्व कारभार सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, शेतातील वीज कनेक्शनचा घोटाळा झाला तर शेतकरी, नागरिकांना तिष्टत रहावे लागत आहे.ज्यावेळेस वायरमन, वीजसेवक येईल त्यावेळेसच ही कामे होत आहे. यामुळे तीन वायरमनवरच कामाचा प्रचंड ताण येत असून वयोमानानुसार यातील काही वायरमनना पोलवरील दुरुस्तीचे काम जमत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक, युवक, शेतकऱ्यांच्या मदतीने ही कामे करावी लागत आहे.
याबाबत अनेक शेतकरी, ग्रामस्थांनी वारंवार मागणी करुनही वीज वितरण कार्यालयातील अधिकार्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
सध्या औंध भागातील तेरा गावांमध्ये सुमारे सहा हजार घरगुती वीज कनेक्शन आहेत तसेच शेती पंप,औद्योगिक व लघुउद्योगाची सुमारे दिड हजार वीज कनेक्शन आहेत. त्यामुळे काम करणारे कर्मचारी कमी व कामाचा ताण अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वाढत्या कामामुळे अनेक अडचणींना सात गावातील वीज ग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. तरी याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.