पाटण,(किल्ले दातेगड) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद्स्पर्शाने पावण झालेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटण तालुक्यातील किल्ले दातेगडावर 11 व 12 नोव्हेंबर रोजी चौथे दुर्ग संमेलन होत आहे याचा पाटणवासिय म्हणून अभिमान वाटत आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून शिवप्रेमी युवकांच्या श्रमदानातून काम उभे राहत आहे. दुर्ग संमेलनासाठी 60 टक्के नोंदणी पूर्ण झाली असून 23 जिल्ह्यातून संमेलनार्थीनी नोंदणी केली आहे. संमेलनकाळात किल्ले दातेगडावर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असून दुर्ग संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती स्थानिक संयोजन समितीचे श्रीमंत सरदार सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
चौथ्या दुर्ग संमेलनासंदर्भात माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी दुर्ग संमेलनाच्या लोगोचे अनावरण प्रा. के. एन. देसाई यांच्या हस्ते व संमेलनार्थींच्या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ कराडचे नगरसेवक सौरभ पाटील यांच्या हस्ते झाला.
सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे चौथे दुर्ग संमेलन किल्ले दातेगडावर होत असल्याने तालुक्यासह पंचक्रोशीत चैतन्य निर्माण झाले आहे. शिवभक्तीची व दुर्गप्रेमींची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून त्यात या संमेलनाचे मोठे योगदान आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा संमेलनात 14 हून अधिक शिवव्याख्याते, दुर्गप्रेमी, इतिहास तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शस्त्रास्त्र प्रदर्शन, शस्त्रास्त्र प्रात्यक्षिक प्रशिक्षण, शाहिरी कार्यक्रम, आतषबाजी अशा भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर संस्थान यांच्या हस्ते होत असून यात इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडूरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, राज्यातील महान शास्त्रज्ञ संग्राहक गिरीषराव जाधव, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील, प्रा. कुलदीप देसाई, डॉ. संदीप महिंद गुरूजी, दुर्ग संवर्धनाची चळवळ बळकट करणारे श्रमिक गोजमगुंडे, अमरसिंहराजे जाधवराव, शिवरायांच्या दक्षिणदिग्विजयाचे अभ्यासक अनिकेत यादव, शस्त्रास्त्र संग्राहक विक्रमसिंह पाटील, छत्रपती शाहूमहाराज यांच्या जीवनचरित्रावर विशेष अभ्यास करणारे अजय जाधव, नितीन भाडळे आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. 11 रोजी टोळेवाडी गावातून शोभा यात्रा काढून किल्लेदाते गडावर उद्घाटन होताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, सीईओ डॉ. कैलास शिंदे उपस्थित असणार आहेत. पहिल्या दिवशी प्र. के. घाणेकर यांच्या हस्ते दुर्गपूजन, धारेश्वरचे निलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन होत आहे. सकाळी 11.30 ते 2.30 पर्यंत उद्घाटन सत्र झाल्यानंतर व्याख्यानासोबत शस्त्रास्त्र प्रदर्शन, प्रशिक्षण होणार आहे. सायंकाळच्या सत्रात व्याख्यानांना प्रोजेक्टरची साथ. महाराष्ट्रातील अन्य गडकिल्ल्यांवर उभे राहिलेले काम तसेच शिवकाळातील प्रत्यक्ष दाखल्यांसह सायंकाळ रंगणार आहे. रात्रीला विख्यात शाहीर देवानंद माळी व बालशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पोवाडा, दांडपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळ व मध्यरात्री मशाल प्रज्वलनाबरोबरच आतषबाजी होणार आहे.
दुसर्या दिवशीच्या सत्रात दुर्ग चढणे, सूर्य नमस्कार, घोषणा गारद या स्पर्धा होणार आहे. विविध व्याख्यानांनी दुपारचे तिसरे सत्र भोजन होईल व संमेलन सांगतेकडे वळेल. यात प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे महाराष्ट्रातले शिवतांडव या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे चौथे दुर्ग संमेलन मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी तालुक्यातील शिवभक्त व दुर्गप्रेमींकडून परिश्रम घेतले जात आहे. जेवण्यापासून ते झोपण्यापर्यंत सारे नियोजन पूर्ण झाले आहेे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोव्यातून यंदा संमेलनार्थीची नोंदणी सुरू आहे.
पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष चंद्रहार निकम, विक्रमसिंह पाटील, अजय जाधव, अमृत कुलकर्णी, महेश पाटील, दीपक भिसे, ज्येष्ठ पत्रकार इलाही मोमीन, दीपक प्रभावळकर, शंकरराव मोहिते, माजी सरपंच नारायण डिगे, शंकरराव कुंभार, मनोहर यादव, फत्तेसिंह पाटणकर, रविंद्र सोनावले, महादेव खैरमोडे, नाना पवार, पंकज मुळे, सौरभ फुटाणे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
व्यासपीठाला प्रमोद मांडे विचारमंच नामकरण –
गेल्या तिन्ही दुर्ग संमेलनात उपस्थित असणारे व वर्धनगड संमेलनाचे स्वागताध्यक्ष दुर्ग महर्षी प्रमोद मांडेसर यांना हे संमेलन समर्पित करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यंदाच्या व्यासपीठाला दुर्गमहर्षी प्रमोद मांडे विचारमंच असे नामकरण करण्यात येणार असून पहिल्या दिवशी रात्री 9 वाजता त्यांच्या निवडक भाषणांच्या ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येणार आहेत. दातेगडालाही मांडे यांनी अनेकदा भेटी दिल्या आहेत.
(छायाचित्र : शंकर मोहिते, पाटण)