सातारा दि. ८ – कोणतीही साधन सुविधा नसताना इंग्रज सरकार विरोधात कट रचून त्यामध्ये स्वतःच्या प्राणांची बाजी लावणे ही गोष्ट साधी नाही. म्हणूनच अशा हुतात्म्यांना अभिवादन करणे आणि त्यांनी ज्या पद्धतीने धर्म – जातीच्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला त्याच पद्धतीने आपणही माणुसकी व सलोख्याचे वातावरण जपणे हीच या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र चे उपाध्यक्ष व जेष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी केले.
सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालय यांचा इतिहास विभाग व जिज्ञासा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सातारच्या गेंडा माळावरील फाशीचा वड येथे ८ सप्टेंबर १८५७ रोजी देह दंडाची शिक्षा सुनावलेल्या सतरा जणांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विजय मांडके बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रा डॉ राजेंद्र घाडगे होते. यावेळी जिज्ञासा मंचचे निलेश पंडित हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एक राष्ट्र म्हणून बिजारोपण करण्याचे काम या १८५७ च्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या उठावामुळे झाले असे सांगून विजय मांडके यांनी सातारा राजद्रोहाच्या खटल्याची संपूर्ण तपशीलवार माहिती सांगितली.
जिज्ञासा मंचचे निलेश पंडित यांनी ऐतिहासिक ठेवा जतन केला पाहिजे व त्याचे उत्तरदायित्व तरुण पिढीवर आहे असे सांगून फाशीच्या वडाच्या संदर्भातील ऐतिहासिक माहिती सांगितली. यावेळी प्रा डॉ राजेंद्र घाडगे यांचेही भाषण झाले.
इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ. राजेंद्र सातपुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
इतिहास विभागाचे प्रा गौतम काटकर यांनी आभार मानले.
यावेळी डॉ दीपक माने , प्रमोद परामणे , गणेश कारंडे , कॅप्टन मोरे , डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. उदय लोखंडे, डॉ जमीर मोमीन, डॉ. शिवाजीराव झांझुरणे, अमित कांबळे यांच्यासह विद्यार्थी , विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. संयोजन अय्याज मुलाणी, अभिषेक भिसे, अस्तिका आगासे, सादिका बागवान, यश लाड, अनिता चाळके, तन्वी लोहार, निकिता माने, अनुष्का कदम, राज घाडगे यांनी केले.
हुतात्म्यांची ध्येये जपणे हे युवा पिढीचे उत्तरदायित्व -: विजय मांडके ; फाशीचा वड येथे हुतात्म्यांना कला वाणिज्य महाविद्यालयाचे अभिवादन
RELATED ARTICLES