सातारा : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाने जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि. 27 फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया सुरू केलेली असून ती अंतिम टप्प्यात आहे.
याबाबत कोर्टानेही सकारात्मक निर्णय दिलेला आहे. विशेष संवर्ग 1 मधील विधवा. परित्यक्ता, अपंग, कुमारिकांना खर्या अर्थाने न्याय मिळून त्यांना सोयीच्या ठिकाणी बदली होणार आहे. म्हणून बदली कार्यवाही करून लगेच विना अट कार्यमुक्त करावे.
विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत 30 किमीपेक्षा जास्त अंतरावरील पती-पत्नीचे एकत्रीकरण होवून त्यांचे कुटूंंब खर्या अर्थाने एक होवू शकणार आहे. म्हणून बदली कार्यवाही करून लगेच कार्यमुक्त करावे. वर्षानुवर्षे दर्याखोर्यात, डोंगराळ भागात, दुर्गम ठिकाणी काम करणार्या शिक्षकांना न्याय मिळून ते प्रथमच सोयीच्या ठिकाणी येवू शकणार आहेत. त्यासाठी बदली कार्यवाही त्वरीत करावी.
जिल्हांतर्गत बदल्या झाल्यानंतर अंतरजिल्हा बदली टप्पा 2 त्वरीत सुरू करावा. या मागण्यासंदर्भात शिक्षकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणात अनिल कांबळे, संजय वाघमारे, विकास दिवटे, समीर नेवसे, वैभव देवकर, महेश धुमाळ, भाउसाहेब जाधव, आनंद फरांदे, राजेश धनावडे, खंडेराव काळे, प्रविण क्षीरसागर, सौ. मनिषा भिंगारदिवे, प्रदिप कुंभार, अरविंद अवसरे, अल्ताफ मणेर, कृष्णात कुंभार, सचिन राउत यांच्यासह शिक्षक सहभागी झाले आहे.