नागठाणे: बिगरपरवाना फ्लेक्स बोर्ड लावल्याच्या कारणावरून काशीळ (ता.सातारा) येथील सुमारे 19 जणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोरगाव पोलिसांनी येतजील 6 बिगरपरवाने बोर्ड ताब्यात घेतले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये नूतन सरपंचासह सदस्य, राजकीय कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
काशीळ येथे नुकतीच नवीन ग्रामपंचायत सदस्यांचा पदग्रहण, उपसरपंच निवड कार्यक्रम व यात्रेचा असा एकत्रित कार्यक्रम पार पडला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी नूतन पदाधिकार्यांच्या अभिनंदनाचा व यात्रेकरूंच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड काशीळ-पाली रोडलगत लावले होते. यावेळी बंदोबस्तास करत असताना सपोनि संतोष चौधरी यांनी येथे चौकशी केली असता काही बोर्ड हे ग्रामपंचायत,पोलीस ठाणे, महामार्ग प्राधिकरण व अन्य शासकीय कार्यालय यांची परवानगी न घेता लावल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ कारवाई करत अश्या विनापरवाना 6 फ्लेक्स बोर्ड ताब्यात घेतले.
याप्रकरणी सरपंच सुभाष गणपती जाधव,सदस्य अंकुश रामचंद्र सूर्यवंशी, सुरेश बाजीराव माने, संजय तुकाराम माने, शिवसेना नेते सुनील माने, किशोर माने, विशाल साळुंखे (पैलवान), शंतनू कांबळे, संदीप माने, रोहन जाधव, बापूराव तळेकर, रजत माने, रविराज लोहार, सत्यम जाधव, ओंकार, भारत, विकी, ओंकार, अमोल माने (सर्व रा.काशीळ,ता.सातारा) यांच्या विरोधात महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम 3, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम 3 व भ.दं. वि.स 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.