* गणेश मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत * मूर्ती विसर्जनाचे नियोजनाचे काय!*
सातारा: शहरातील कुंभारवाडयातील मूर्तीकार गणेशमूर्ती घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. मूर्तीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी लगबग सुरु आहे. तसेच या वर्षीचा गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा करायचा निर्धार करीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची कुंभारवाडयाकडे रेलचल वाढली आहे.
गणेशमूर्तीची ऑर्डर देणे व मनासारखी मूर्ती बनवून घेणे यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची धडपड सुरु आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यां मध्ये उत्साह जाणवत आहे. परंतू गणेशमूर्ती विसर्जनाबाबतची चिंता ही त्यांना भेडसावत आहे. सातारा नगरपालिका याबाबतचे अद्याप कोणतेच नियोजन केल्याचे दिसत नसल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यामध्ये बोलले जात आहे.
गणेश चतुर्थीचा दिवस जसजस जवळ येत आहे तसतसा गणेशभक्तामध्ये नवचैतन्य प्राप्त होत आहे. गणेश उत्सव हा सार्वजनिक स्वरुपाचा असल्याने या माध्यमातून सामाजिक परिवर्तन व प्रबोधनासाठी अनेक मंडळाचे नियोजन सुरु आहे. मोठया भक्तीभावाने साजरा होणारा गणेशउत्सव दिवसेंदिवस सामाजिक ऐक्याचे प्रतिक ठरत आहे.
सातारा शहरातील विविध गणेश मंडळे गणेशमुर्तीचे पावित्र्य राखत धार्मिक पध्दतीने पूजाअर्चा करीत गणेशमुर्तीची स्थापना करतात. 11 दिवस ही मंडळे मोठया भक्तीभावाने आरती करुन गणेशबप्पाचा आशिर्वाद घेतात. पण या बाप्पाच्या विसर्जनाबाबत तितकेसे जागृती बाळगत नसल्याचे जाणवते. अनेक मुर्ती विसर्जनानंतर तळयात छिन्नविच्छीन अवस्थेत आढळून येतात.
गणेशमुर्तीच्या विसर्जनासाठी गेल्या वर्षी राधिकारोडवरील प्रतापसिंह कृषी केंद्राच्या जागेत कृत्रिम तळयाची तात्पुरती निर्मिती केली होती. यासाठी नगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले. मंगळवार तळे व मोतीतळे येथील जलसाठे मूर्ती विसर्जनाने प्रदूषित होवू नये म्हणून राधिकारोडवर तात्पुरत्या स्वरुपाचे कृत्रिम तळे निर्माण केले. या तळयात अनेक मंडळाने मूर्ती विसर्जन केले. कालांतराने या मूर्ती पाण्याच्या वर येवून छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याचे अनेकांनी पाहिले. ज्या मूर्तीना भक्तांनी मोठया भक्तीभावाने पूजले त्या मूर्तीची विसर्जनानंतर झालेली विटबना पाहून अनेक भक्ताना दु:ख झाले.
या वर्षीतरी मूर्ती विसर्जनाचे अचूक नियोजन करताना विसर्जन झालेल्या मूर्तीचे विटबन होवू नये याची दक्षता घेवूनच मूर्ती विसर्जनाचे नियोजन व्हावे.
मूर्ती विसर्जनाची जागा निश्चित नसल्याने अनेक गणेश मंडळापुढे मूर्ती विसर्जनाचा मोठा प्रश्न उभा राहीला आहे. उत्सव तर मोठयाप्रमाणात साजरा करायचा पण विसर्जनाचे काय! हा सर्व मंडळातील कार्यकर्त्यामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे. गेल्या वर्षी कृत्रिम तळयाची सातारा नगरपालिकेने निर्मिती करुन तात्पुर्ती सोय केली. यावर झालेला लाखो रुपये खर्च मातीमोल ठरला. नियोजन व समन्वयाच्या अभावामुळे जनतेचे लाखो रुपयाचा चुराडा झाला. निदान या वर्षीतरी मागील घटनेतून बोध घेवून मूर्ती विसर्जनाची समस्या दूर करावी.
– श्रीरंग काटेकर, सातारा
सामाजिक कार्यकर्ते