सातारा : कास परिसरातील 13 अवैध बांधकाम धारकांंवर महसुलकडून गुन्हे दाखल करण्यात करण्यात आल्याची माहिती तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली. दरम्यान पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता अवैध बांधकाम धारकांंवर कायदेशीर फास आवळण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.
जागतिक वारसास्थळ असलेल्या कास परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट झाला होता. याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. ना. शिवतारेंनी चार महिन्यांपूर्वी या भागाची पाहणी करून या धनदांडग्यांच्या मुजोरीला लगाम घालण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तदनंतर प्रशासनाने कारवाईचे कागदीघोडे नाचवले. प्रशासनाच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी सुमारे 30 बांधकामधारक न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने फटकरल्यावरही प्रशासन गप्प होते. दरम्यान कास रस्ता खचल्यानंतर दुरुस्ती करणार्या ठेकेदाराला पळवून लावल्याने ग्रामीण-डोंगरी भागातील नागरिकांना त्रास होत असल्याने पत्रकारांनी आक्रमक होत पालकमंत्र्यांना धारेवर धरल्यावर ना. शिवतारेंनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्यांना खडेबोल सुनवत कारवाई करण्याचे आदेश देताना कासप्रकरणी विचारणा केली होती. पालकमंत्री शिवतारे शनिवार, ता. 28 रोजी नियोजन समितीची बैठक असल्याने सातार्यात आहेत. त्यापूर्वीच 13 अवैध बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खरेतर या भागातील सरसकट 96 अवैध बांधकामांवर गुन्हे दाखल करणे क्रमप्राप्त असताना हा कारवाईचा फार्स करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून यातून प्रशासन काय सिद्ध करणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असले तरी पालकमंत्र्यांना उत्तर देण्यासाठी 13 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करून जुजबी कारवाई न करता ठोस धडक कारवाई करून बेकायदेशीर इमले उभारणार्यांवर कायद्याचा दंडुका उगारावा अशी मागणी सातारकर करत आहेत.
पालकमंत्र्यांचा दौरा लागला की तहसिलदार कासच्या धूळखात पडलेल्या फायली मागवून यंत्रणा सक्रिय करतात, हे गेल्या दोन महिन्यात झालेल्या 11 बांधकामांमुळे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे बांधकामे काही थांबत नसल्याचे महसुलाच्या अधिकार्याने नाव न छापण्याच्या विनंतीवरून सांगितले.
– गेल्या 25 वर्षात ढिगभर पालकमंत्री झाले पण कासच्या प्रश्नावर कोणी तोंडदेखलीही कारवाई केली नाही. मात्र शिवतारेंनी पोटतिडकीने हा प्रश्न हाताळताना प्रशासनावर सकारात्मक दबाव ठेवल्याने पालकमंत्र्यांच्या कार्यप्रणालीचे जनमानसातून स्वागत होत आहे.
जय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली असणार्या काँजरवेटीव समितीकडून नगरविकास खात्याकडे कास, सडावाघापूर आणि चाळकेवाडी या भागातील बांधकामांबाबत आराखडा मंजुरीसाठी अंतिम टप्यात आहे. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर सर्व बांधकामांची पाहणी करून कारवाई केली जाईल. – डॉ. स्वाती देशमुख, प्रांताधिकारी, सातारा.