पाटण :- जुने विहे ता.पाटण येथे १९६७ साली झालेल्या भुकंपावेळी झालेले नुकसान लक्षात घेऊन नागरीकांच्या सुरक्षेतेसाठी शासनाने नवीन विहे येथे भुकंपग्रस्तांना घरे बांधण्यासाठी जागा ऊपलब्ध करुन दिली. काहीनी ही जागा स्विकारली तर काहीनी नाकारली. शिल्लक राहिलेल्या जागेचा शासन व ग्रामपंचायत विहे यांनी ताबा घेतला असता या मोकळ्या जागेवर सरपंच आनंदा मोरे यांना हाताशी धरून गावातीलच मंगेश पाटील यांनी जागेवर बेकायदेशिर अतिक्रमन केले आहे. या बाबतीत ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी सरपंच आनंदा मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणला असुन शासन व ग्रामपंचायतीच्या जागेवर झालेले अतिक्रमन काढण्याची मागणी विहे ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि तहसिलदार पाटण यांना निवेदनाव्दारे केले आहे.
निवेदनात पूढे म्हणले आहे विहे ता.पाटण येथे जुने विहे या ठिकाणी १९६७ साली झालेल्या भुकंपावेळी गावच्या सुरक्षेतेसाठी भुकंपग्रस्त नागरीकांना घरे बांधणे व स्थलांतरासाठी नविन विहे येथे शासनाने जागा उपलब्ध करून दिली. तशा पावत्या शासनाकडून भुकंपग्रस्त नागरीकांनी स्विकारल्या. जागा मात्र काही भुकंपग्रस्तांनी स्विकारली तर काही भुकंपग्रस्तांनी नाकारली. नाकारलेली जागा ग्रामपंचायत विहे यांनी ताब्यात घेतली. सद्या या मोकळ्या जागेवर ग्रामपंचायत विहे यांचा ताबा असून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहमतीने या मोकळ्या जागेतील काही जागा न्यु. इंग्लिश स्कुल विहे यांना शाळा बांधण्यासाठी दिली. शिल्लक राहिलेल्या जागेवर शासन व ग्रामपंचायती शिवाय इतर कोणाचाही अधिकार अथवा ताबा नसताना गावातीलच इसम मंगेश शामराव पाटील यांनी सरपंच आनंदा मोरे यांना हाताशी धरुन यातील मोकळ्या जागेतील काही हिस्यावर अतिक्रमन करुन शेड उभारले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सरपंच यांना अनेक वेळा विचारले असता सरपंच यांच्याकडून ग्रामस्थांना काहीच उत्तर मिळत नाही. अथवा कारवाई करत नाहीत. तर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी सदर जागेवर अतिक्रमण करता येत नाही. असे लेखी नोटीस मंगेश पाटील यांना दिले आहे. म्हणून ग्रामसेवक यांना सरपंच आनंदा मोरे आणि मंगेश पाटील यांच्याकडून दमकावले जात आहे. सदर बाब बेकायदेशिर व चुकीची होत असून शासन व ग्रामपंचायतीच्या ताब्यात आसणाऱ्या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे. व दोषिवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या निवेदनावर ग्रामस्थ अनिरुध्द जाधव, रविंद्र कदम, दत्तात्रय यादव, सचिन पानस्कर, बाबुराव जंबुरे, विक्रम संकपाळ, भाऊसो संकपाळ, अनिल सुर्यवंशी, अरुण संकपाळ, मनोज जंबुरे, सुहास पाटील, सचिन पाटील, हिंदूराव जंबुरे यांच्या सह्या आहेत.
सरपंच आनंदा मोरे यांच्यावर अविश्वास ठराव.?
शनिवारी ग्रामपंचायत विहे यांची मासिक सभा झाली. या सभेत सरपंच आनंदा मोरे यांनी सदर जागा मंगेश पाटील यांच्या नावावर ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्याचा ठराव मांडला असता उपस्थित सदस्यांनी याठरावाला विरोध करत सरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याने त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला.