कानपूर : पाहुण्या न्यूझीलंड फलंदाजांची फिरकी घेत भारताने ऐतिहासिक 500व्या कसोटी क्रिकेट 197 धावांनी विजय मिळविला. भारताच्या या विजयाचे फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा शिल्पकार ठरले. भारताने दिलेल्या 434 धावांच्या आव्हानापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव 236 धावांत संपुष्टात आला. भारताचा हा 130 वा कसोटी विजय ठरला.
चौथ्या दिवशी न्यूझीलंडची दुसर्या डावात 4 बाद 93 अशी घसरगुंडी उडाली होती. आज अखेरच्या दिवशी सँटनर आणि राँचीने सुरवातीला भारतीय गोलंदाजांचा यशस्वी प्रतिकार केला. अखेर राँचीला 80 धावांवर बाद करत जडेजाने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने पहिल्या डावाप्रमाणे दुसर्या डावातही आपल्या प्रभावी गोलंदाजीचा वापर सुरु केला. पण, मिशेल सँटनर आणि बी. वॅटलिंग यांनी चिवट प्रतिकार करत फिरकीला यशस्वी तोंड दिले. अखेर कर्णधार कोहलीने शमीला पाचारण केले. शमीने वॅटलिंगला 18 धावांवर पायचीत बाद केले. त्यापाठोपाठ आपल्या पुढच्याच षटकात मार्क क्रेगला 1 धावेवर त्रिफळाबाद करून भारताचा विजय दृष्टीक्षेपास आणला.
भारताच्या विजयाचा अडसर ठरलेल्या सँटनरला अश्विनने 71 धावांवर बाद केले. सँटनरने 179 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 71 धावा केल्या. त्याने पहिल्या डावातही भारतीय गोलंदाजांना झुंजविले होते. यानंतर मात्र, अश्विनने औपचारिकता पूर्ण करत ईश सोधी आणि वॅगनर यांना बाद करून भारताला ऐतिहासिक 500 व्या कसोटीत विजय मिळवून दिला. अश्विनने दुसर्या डावात सहा बळी घेतले. यामुळे त्याने पुन्हा एकदा दोन्ही डावात दहा बळी मिळविण्याची कामगिरी केली.
त्यापूर्वी, चौथ्या दिवशी मुरली विजय, चेतेश्वर पुजारा यांच्यापाठोपाठ रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीने प्रथम न्यूझीलंडसमोरील मार्ग कठीण केला. त्यानंतर अश्विनच्या फिरकीने त्यांना पराभवाच्या खाईट लोटले. ल्युक राँची 38 आणि मिशेल सँटनेर 8 धावांवर खेळत असून, न्यूझीलंड अजून 341 धावांनी दूर आहे. अखेरच्या पाचव्या दिवशी त्यांना भारतीय फिरकीसमोर तीन सत्रे खेळून काढण्याचे आव्हान आहे. फिरकीस साथ देणार्या खेळपट्टीवर त्यांना हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे आता ऐतिहासिक कसोटीत भारतीय संघ विजयावर केव्हा शिक्कामोर्तब करणार, हीच अखेरच्या दिवसाची औपचारिकता राहील. 1 बाद 159 धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने झटपट विकेट गमावल्या. विजय, पुजारा पुन्हा एकदा मोठी खेळी रचण्यात अपयशी ठरले. कोहली लवकर बाद झाला; पण या वेळी रोहितला आवश्यक असणारा कसोटी सामन्यातला धावांचा सूर गवसला. जडेजाच्या साथीत त्याने केलेली वेगवान 100 धावांची भागीदारी भारताची आघाडी भक्कम करणारी ठरली. रोहित 68; तर जडेजा 50 धावांवर नाबाद राहिले. जडेजाचे अर्धशतक झाल्यावर कोहलीने भारताचा दुसरा डाव 5 बाद 377 धावसंख्येवर घोषित करून न्यूझीलंडसमोर 434 धावांचे आव्हान ठेवले होते.