चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत हाणला विरोधकांना टोला
शिवनगर : कृष्णा कारखान्याचे हे संचालक मंडळ जाणार-जाणार म्हणून विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी कृष्णेची निवडणुक ही पाच वर्षांनीच होणार आहे. आमचा न्यायालयावर विश्वास असून, विरोधकांनीही न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखून आपल्या बाष्कळ वल्गना बंद कराव्यात आणि सभासदांची होणारी दिशाभूल थांबवावी, असा टोला य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांना लगाविला. या सभेत कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेत वाढ करण्याचा आणि त्या अनुषंगाने कारखान्याच्या यंत्रसामुगीमध्ये आधुनिकिकरण करण्यास मान्यता देणारा महत्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर सभासदांच्या अभूतपूर्व उत्साहात पार पडली. सभेच्या व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जगदीश जगताप, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, सुजित मोरे, गिरीश पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, माणिकराव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सांगली जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, बाळासाहेब लाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आलेख मांडताना अहवाल सालातील सुरवातीची 3 महिने विरोधकांच्याच हातात कारखान्याचा कारभार असल्याचे स्पष्ट करून, अवघ्या 9 महिन्याच्या कारकीर्दीत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सापडलेल्या कृष्णा कारखान्याला आर्थिक र्स्थैय मिळवून देण्यात आमच्या संचालक मंडळाला यश आल्याचे नमूद केले. गेल्यावर्षी निवडणुकीत आम्ही सातत्याने तत्कालीन सत्ताधार्यांना कारखान्यावर कर्ज किती आहे, हे जाहीर करण्याचे आव्हान दिले. पण त्यांनी या प्रश्नाचे उत्तर कधीच दिले नाही. अखेर आम्हालाच सत्तेवर आल्यानंतर कारखान्यावर 520 कोटींचे कर्ज असल्याचे उत्तर गेल्या वार्षिक सभेत आपल्याला द्यावे लागले होते. आम्ही सत्तेवर आल्यानंतर शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आणि काटकसर करत कोट्यवधी रूपयांची कर्जे आणि देणी भागविली असून, अद्यापही गेल्या संचालक मंडळाने करून ठेवलेले कर्ज आम्ही फेडत आहोत. गत संचालक मंडळाने 274 वाहतूक तोडणीदारांच्या नावे बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणात 19 कोटींचा अपहार झाला आहे. या तोडणी वाहतूकदारांनी त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. यासह अन्य अनेक खरेदी तसेच कामगार भरती अशा अनेक प्रकरणांची कलम 83 नुसार चौकशी सुरू असून, या चौकशीत गत संचालकमंडळाच्या गैरकारभाराचे सत्य नक्कीच बाहेर पडेल.
गेल्या 9 महिन्यांच्या कारकिर्दीत कारखान्याने गत संचालक मंडळाच्या काळातील 16 कोटींचा तोटा भरून काढत, 9 कोटी नफ्यात कारखाना आणला आहे. त्यामुळे ब वर्गवारीमध्ये असणार्या आपल्या कारखान्याला यंदा अ वर्ग ऑडिट दर्जा प्राप्त झाला आहे. आमच्या संचालक मंडळाने स्वीकारलेले मोफत साखरेचे धोरण कायमस्वरूपी राहणार असून, तीन वर्षात किमान एकदा ऊस घालविणार्या सभासदास साखर कार्ड देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यात विजेला मोठ्या प्रमाणात असलेली मागणी व वीज विक्रीचा दर पाहता, आपल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी कारखान्याच्या यंत्रसामुग्रीत बदल करण्यासाठी आम्ही पाऊले उचलणार आहोत. कृष्णेत चांगले काम करणार्या कामगारांना पूर्ण संरक्षण मिळणार असून, कारखान्याचा नवीन विकास आराखडा लवकरच आपल्यासमोर ठेवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर अल्पावधीतच कारखान्यात आमूलाग्र बदल केले आहेत. सत्ता हाती घेतल्यानंतर सुरवातीच्या काळात कुठलीही आर्थिक संस्था कारखान्याला कर्ज द्यायला तयार नव्हती. अशावेळी कृष्णा बँकेने कर्ज उपलब्ध करून दिले. आज कारखान्याने आपली चांगली पत निर्माण केली असून, आता राष्ट्रीयीकृत बँकाही कर्जासाठी कारखान्याच्या मागे लागल्या आहेत. स्व. जयवंतराव आप्पांचे मोफत साखरेचे स्वप्नही या संचालक मंडळाने सत्यात उतरविले असून, लवकरच सभासदांच्या सोयीसाठी कारखान्याच्या गट ऑफिसवर स्मार्ट कार्ड मशिन्स बसविले जाणार आहेत. सर्वसामान्य सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात या संचालक मंडळाला यश आले असून, आता कारखान्याला महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याच्या आवारात गत संचालक मंडळाच्या काळात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सदोष आहे. हा छत्रपतींचा अवमान असून, लवकरच कारखान्याच्या तरूण सभासदांच्या माध्यमातून लोकवर्गणी काढून कारखान्याच्या परंपरेला साजेल असा शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मनोदयही डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सभासदांना मोफत साखरेची वचनपूर्ती केल्याबद्दल आणि कारखान्याला आर्थिक स्थैर्य मिळवून दिल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करून, सभासदांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासन निर्देशाप्रमाणे 2016-17 च्या गळित हंगामासाठी प्रति मे. टन 10 रूपये भाग विकास निधी देण्यास मान्यता देणारा ठरावही मंजूर करण्यात आला.
व्हाईस चेअरमन लिंबाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, वसंतराव साळुंखे, श्रीरंग देसाई, बाबासाहेब शिंदे, भगवानराव पाटील, संजय पाटील, माणिकराव थोरात, प्रदीप थोरात, सर्जेराव निकम, सरपंच प्रविणा हिवरे, सर्जेराव दमामे, आनंदराव पाटील, दीपक जाधव, संग्राम पाटील, हिंदुराव थोरात, निवासराव पवार, नारायण शिंगाडे, ज्येष्ठ सभासद संपतराव पाटील-बहेकर, मानसिंगराव पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाला स्व. जयवंतराव भोसले यांचे नाव
कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेत सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालयाचे नामकरण सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) कृष्णा कृषी महाविद्यालय असे करण्याचा ठराव सभेत टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.