Sunday, March 23, 2025
Homeवाचनीयअग्रलेखप. महाराष्ट्राच्या दरवाज्यावर इसिसची दस्तक

प. महाराष्ट्राच्या दरवाज्यावर इसिसची दस्तक

संपूर्ण जगाला इसिसच्या अमानवी व अमानुष दहशतवादाने भयकंपीत करुन टाकले आहे. भारतापासून साडेदहा हजार किलोमीटर अंतरावर इराण व सिरीया या देशात धुमाकुळ घालणार्‍या लष्करी दहशतवादी संघटनेचा मृत्यूचा नंगानाच अंगावर शहारे आणणारा आहे. या संघटनेचा दहशतवाद मध्य आशियातून ज्या वेगाने भारताच्या दिशेने सरकला व भारतासारख्या संघ राज्य लोकशाही पध्दतीची रचना खिळखिळी करण्याचा डाव जो रचला जातोय त्याची दस्तक कोकण, मराठवाडा, उत्तर नाशिक नंतर राज्यात समृध्द समजल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रावर दिली गेली आहे. दहा वर्षापूर्वी औरंगाबाद येथे पकडलेल्या शस्त्रे व स्फोटकाच्या मोठ्या साठ्याच्या प्रकरणी विशेष मकोका न्यायालयाने बीडच्या लष्करे तोयबाचा दहशतवादी अबु जिंदालवर जन्मठेपेचे शिक्का मोर्त्तब केले आहे. अबु जिंदालच्या आडोशाने मोहंम्मद शेख, मोहंम्मद मुझफर मुस्ताक शेख, जावेद अहंमद, अफझल खान, बिलाल अहमद अशी तोयबाच्या संस्कृतिमध्ये रुजलेली दहशतवादाची मोठी फळी समोर आली आहे. यातील बरेचसे तरुण हे मराठवाड्याचे होते. हे चित्र महाराष्ट्रासाठी निश्‍चित धक्कादायक आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या कॉरिडॉरमध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी व तेथील नामवंत राजकीय नेतृत्व इसिसच्या रडारवर आहेत. मुळचा बीडच्या असलेल्या जुंदालवर 26।11 च्या हल्ल्यामधील आरोपींना हिंदी शिकवल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामध्ये मुंबईतील 166 जण मृत्यूमूखी पडले होते. त्यामुळे मुंबई, दिल्ली, नाशिक व लातूर या चार ठिकाणी जुंदालवर 21 खटले न्यायालयात सुरु आहेत. मराठवाडा कार्यक्षेत्र माणनारा जुंदाल याने पश्‍चिम महाराष्ट्रातही अशा घातक मुलतत्ववादी माथेफिरु तरुणांची फौज उभी करण्यासाठी पुणे ते सिंधूदुर्ग असा प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, पुणे मुंबई या पट्ट्यातील लष्करी केंद्रे यांची रेकी करण्याची जबाबदारी जुंदालवर देण्यात आली होती. येथील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता व पुणे एटीएस यांचा चोख बंदोबस्त यामुळे जुंदालला आपले टारगेट मराठवाड्यात हलवायला लागले. मात्र, तिथेच त्याच्या नशीबाचा घात झाला. 9 मे 2006 रोजी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जवळील बारा जोतिलिर्ंगांपैकी घ्रुष्णेश्‍वर मंदिराच्या आवारात अतिरेक्यांनी साठवलेला घातक शस्त्रांचा साठा जप्त केला. एका कारमध्ये 33 किलो आरडीएक्स, 11 एके 47 गन, अडीच हजार काडतुसे व 13 हँड ग्रेनेड असा साठा पोलिसांच्या हाती लागल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. गेल्या 10 वर्षात इसिसच्या महाराष्ट्रातील मास्टर माईंडपर्यंत एटीएस अध्याप पोहचलेली नाही. मात्र त्यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या तयारीचा भाग म्हणून मजबूत असे पुरावे गोळा करण्यात त्यांना यश आले आहे. मराठवाड्यातल्या या ऑपरेशनचा बराचसा रंगीत तालमीचा भाग जुंदालने कोकण पट्टीत रंगवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोकण मराठवाडा यांना सांधणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रातही एजंटांचे जाळे गोपनियरित्या सुरक्षा यंत्रणेला चकवत अद्यापही सक्रीय आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा रडारवर असल्याचे सांगितले जाते. एटीएसच्या या ऑपरेशनमुळे अतिरेकी संघटनांना मोठा झटका बसला. मात्र, त्याही पेक्षा मोठा झटका महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला बसला होता. कारण महाराष्ट्रात सागरी किनारपट्टीकडून दहशतवाद मुंबई ओलांडून अगदी मराठवाड्यात पोहचेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. याचा पहिला धागा राष्ट्रीय तपास एजंन्सीने शोधून काढला. स्फोटकांचा साठा पाकिस्तानातून भारतात आला आहे आणि तो साठा घेवून काही अतिरेकी नाशिक मार्गे औरंगाबादला जाणार आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी लष्करच्या अतिरेक्याकडून हस्तगत केली होती. 5 मे 2006 रोजी केंद्रीय गुप्तचर विभागाने महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला याची सुचना दिली होती. त्या माहितीनुसार एटीएस लगेच कामाला लागले. चारच दिवसात म्हणजे 9 मे 2006 रोजी घातक स्फोटकांनी भरलेल्या दोन कार व एक जीप घेवून अतिरेक्यांची एक टोळी नाशिक नांदगाव मार्गे बीडच्या दिशेने निघाल्याची पक्की खबर मुंबई एटीएसला समजली होती. एटीएसच्या पथकाने या गाड्यांचा पाठलाग सुरु करुन त्यांना नांदगावजवळ गाठले त्यातील एक कार गायब झाली. शिऊरजवळ औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी ही वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. एक सुमो ताब्यात मिळाली मात्र दुसरी सुमो कसाब खेडा मार्गे वेरुळकडे वळाली अतिरेक्यांनी चकवण्यासाठी गाडी घृष्णेश्‍वर मंदिराच्या परिसरात उभी केली. मात्र तेथे कमांडो पथक उभे होते. त्यामुळेच महाराष्ट्रात मोठी घातपाती कारवाई करण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळला गेला. बारा मार्च 1993 मुंबईत 13 ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट झाले. तेव्हा 116 जणांचा बळी गेला होता. यासाठी 23 किलो आरडीएक्स वापरण्यात आले होते. मुंबईत या स्फोटांनी हाहाकार माजवला. त्याही पेक्षा जास्त आरडीएक्स औरंगाबादच्या कारवाईत सापडल्याने गृहमंत्रालयाला याचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यानंतर जिल्हा निहाय एटीएसच्या शाखा सक्रिय करण्याचा निर्णय राबवण्यात आला. शिवाय औरंगाबाद, नांदेड, पुणे, नाशिक, नागपूर या सहा मोठ्या शहरामध्ये दहशतवाद विरोधी पथकांना विशेष अधिकार देेवून जादा कुमक तैनात करण्यात आली. 9 मे ते 14 मे या कालावधीत वेरुळ व परिसरात अतिरेक्यांकडून 43 किलो आरडीएक्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यामुळे घडू पाहणारी घातपात कारवाई किती मोठी होती याचा अंदाज यावा. हा शस्त्रसाठा पकडला गेला नसता तर मराठवाड्यातील औरंगाबाद सह 5 ते 6 शहरे सहज उध्वस्त झाली असती. मात्र एटीएस व स्थानिक पोलिसांच्या कारवाईमुळे राज्यावर आलेले फारमोठे बालंट टळले. वेरुळमध्ये ऑपरेशन एक्स राबवण्यात आले. त्यामध्ये मुझफर अहमद व अब्दूल शकिल या दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली. या अटकेतूनच पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठे रॅकेट समोर येण्याची भिती आहे. पुण्यातही एटीएसने इसिसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली. महाराष्ट्राचा अंतर्गत भाग इसिसने पोखरल्याने आपण किती सुरक्षित आहोत याचा साकल्याने विचार व्हायला हवा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular