क्रांतीकारकांचा जिल्हा असणार्या सातारा जिल्ह्याने भारताच्या अॅथलेटीक्स क्षेत्राला ललिता बाबर हा माणदेशातला 24 कॅरेटचा अस्सल हिरा मोठ्या अभिमानाने बहाल केला आहे. जागतिक पातळीवर सातारच्या क्रीडा परंपरेला धवल यश देणारी माणदेश एक्सपेस लाखो भारतीय व सातारकरांच्या शुभेच्छांच्या इंधनावर अव्याहतपणे धावते आहे. माणच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक किमान ललिताच्या झळाळत्या कामगिरीने पुसला जावा ही माणवासियांची माफक अपेक्षा असु शकते. रियो ऑलंपिकसाठी 28 भारतीयांनी अॅथलेटीक्समध्ये पात्रता मिळवली असली तरी यामध्ये नाशिकच्या तुंगारची कविता राऊत व माणदेशची ललिता बाबर ही दोनच नावे मराठी आहेत. 2015 साली परसन ऑफ द इयर ठरलेली ललिता रिओच्या ऑलंपिक ट्रॅकवर मोठ्या विश्वासाने उतरणार आहे. 3 हजार मिटर ट्रिपल चेस प्रकारात ती भाग घेणार असून याच क्रीडा प्रकारात ललिता आपले कौशल्य अजमवणार आहे. मोही गावच्या काट्याकुट्यातून शाळेसाठी धावणारी ललिता नंतर वेगवेगळ्या स्पर्धासाठी धावू लागली. हिच बिकट वाट आता रिओच्या मैदानावर तिला घेवून गेली आहे. ही तमाम सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ललिताने स्ट्रिपल चेस प्रकारात सुवर्ण पदक मिळवावे या अपेक्षेचा ताण तिच्यावर असणार आहे. मात्र, या अपेक्षा घेवूनच कोणत्याही खेळाडूला एकप्रकारची अंातरिक उर्जा मिळत असते. या उर्जेला सातत्याने व कठोर सरावाने तेवत ठेवण्याची अवघड जबाबदारी ललिता सध्या लिलया पार पाडते आहे. या अनेक गोष्टीसह दिल्लीच्या ट्रॅक अँड फिल्ड व बेंगलूरच्या गोल्डमन स्पोर्ट अॅकॅडमीमध्ये ललिता कसून सराव करत आहे. ललिताच्या या कामगिरीला उत्तेजन देण्यासाठी सातारा जिल्ह्या तील क्रीडाप्रेमींचीसुध्दा धावाधाव अंतिम टप्प्यात असून येत्या रविवारी रन फॉर ललिता ही प्राईड मॅरेथॉन दहिवडी येथे भरवली जात आहे. आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे तसेच माण तालुक्यातील वेगवेगळ्या क्रीडा संघटना यांनी दाखवलेले ललिता प्रेम निश्चित क्रीडा प्रेमींसाठी अभिनंदनीय आहे. सातारा जिल्ह्यातील एखाद्या खेळाडूसाठी राष्ट्रीय दर्जाच्या जवळ जाणारी एखादी मॅरेथॉन भरवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्ट्रिपल चेस हा क्रीडा प्रकार भारतीयांना जरी नविन नसला तरी या अनोख्या क्रीडा प्रकारामध्ये धावण्यासाठी खेळाडूला मोठा दमसास लागतो. ललिताने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 8 सुवर्ण, 6 रौप्य व 9 कास्य अशा 23 पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकचे सुवर्णपदक ललितासाठी निश्चितच आणि अर्थात तमाम सव्वाशेकोटी भारतीयांसाठी सुवर्णक्षण असणार आहे. या क्षणाला उत्तेजन देण्यासाठी रविवारी होणार्या रन फॉर ललिता या मॅरेथॉनमध्ये 15 हजार स्पर्धक धावणार असून या स्पर्धेसाठी रविवारी जिल्हा यंत्रणेने दहिवडी शहराचा वाहतूक आराखडाच बदलला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कितीही राजकीय मतभेद असोत रचनात्मक कामासाठी पक्षीय मतभेद विसरुन एकत्र येण्याचा पुरोगामी विचार सातारा जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी निश्चित जपला आहे. रन फॉर ललिताच्या निमित्ताने हाच सुखावह बदल दिसून येत आहे. या स्पर्धेमधून कदाचित ललिताचा वारसा सांगणारी दुसरी ललिता सातारा जिल्ह्याला सापडू शकेल. माणदेश कन्येच्या निमित्ताने स्ट्रिपल चेस या क्रीडा प्रकाराचा सातारा जिल्ह्यात प्रसार होवू शकेल अशा खेळांडूंसाठी जिल्हा नियोजन समिती निश्चितच आपल्या निधीचे दरवाजे निश्चितच खुले करेल. जिल्हा पातळीवर रंगणारे क्रीडा क्षेत्रातील सडके राजकारण सध्यातरी बाजूला ठेवून ललितासाठी सातारापासून रिओपर्यंत शुभेच्छांचा रेड कारपेट घातला जाणे हे ललितासाठी मानसिक धैर्य वाढवणारे आहे. तिला रिओ ऑलिंम्पिकमध्ये निश्चित सुवर्णपदक मिळो हीच सर्व क्रीडा प्रेमींची अपेक्षा आहे.
रन फॉर ललिता….रन फॉर रिओ
RELATED ARTICLES