कोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी व्यापक बैठक
कोरेगाव : तालुक्यातील चिमणगाव येथे असलेल्या जरंडेश्वर शुगर मिल्स व लक्ष्मी ऑरगेनिक डिस्टीलरीमध्ये शनिवारी दुपारी वाहने चेकिंगवरुन वादावादी झाली. डिस्टीलरीच्या अधिकार्यांनी आमची गाडी चेक करायची नाही, असा पवित्रा घेतला तर कारखान्याच्या सिक्युरिटीने गाडी चेक केल्याशिवाय आत सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. हा वाद पराकोटीला गेल्यानंतर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी वादावादी न करता, चर्चेद्वारे प्रश्न सोडवा, मंगळवार दि. 26 जुलै रोजी पोलीस निरीक्षक एस. एल. पांढरे यांच्यासमक्ष व्यापक बैठक होणार असून, दोन्ही व्यवस्थापनाला या बैठकीस उपस्थित राहण्याची समज पोलिसांनी दिली आहे.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, जरंडेश्वर शुगर मिल्सने आपल्या जागेला कंपाऊंड घातले असून, एकच मुख्य गेट बसवले आहे. या गेटमधून कारखाना आणि लक्ष्मी ऑरगेनिक डिस्टीलरीची वर्दळ चालते. वास्तविक या डिस्टीलरीच्या जागेवरुन दोघांमध्ये फार दिवसांपासून वाद सुरु आहे. त्यामुळे डिस्टीलरीच्या वाहनांना आणि व्यवस्थापनाला कारखान्याच्या सिक्युरिटीने चेकिंगच्या नावाखाली जेरीस आणले आहे. डिस्टीलरीमध्ये येणारी आणि जाणारी व्यावसायिक वाहने, माल वाहतूक करणारी वाहने आणि अन्य गाड्या चेकिंग केल्यास डिस्टीलरीने कधीही तक्रार केलेली नव्हती, मात्र अधिकार्यांच्या गाड्या चेक करण्याचा नवा फंडा सिक्युरिटीने काढल्याने डिस्टीलरी व्यवस्थापन चांगलेच खवळले होते.
शनिवारी दुपारी 1.45 च्या सुमारास लक्ष्मी ऑरगेनिक डिस्टीलरीचे मुख्य व्यवस्थापक एस. आर. पाटील हे आपल्या सहकार्यांसमवेत गाडीने डिस्टीलरीमध्ये चालले होते, कारखान्याच्या सिक्युरिटीने चेकिंगच्या नावाखाली गाडी गेटवरच अडविली आणि तेथून वादावादीला सुरुवात झाली. चेकिंग केल्याशिवाय गाडी आत सोडणार नाही, असे सिक्युरिटीने बजावल्यानंतर पाटील यांचा पारा चढला, त्यांनी नकार दिला आणि गाडी तशीच आत नेणार, असे ठामपणे सांगितले. त्यातून वादावादीला सुरुवात झाली. आवाज वाढल्याने डिस्टीलरीमधील अन्य कामगार गेटवर दाखल झाले. त्यानंतर चीफ सिक्युरिटी ऑफीसरने कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद राक्षे यांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी सर्वांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले.
कोरेगावच्या न्यायालयाची ऑर्डर आहे, मग आमच्या गाड्या का अडवता, व्यावसायिक वाहने अडविली तर आम्ही बोलत नाही, अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या गाड्या का अडवता, असा प्रश्न पाटील यांनी केला. त्यावर कारखाना व्यवस्थापनाने सिक्युरिटीचा प्रश्न आहे, आमच्या गाड्या चेकिंग होतात, तुमच्या चेक झाल्यातर अडचण काय आहे, किरकोळ विषय आहे, वाद कशाला, अशी भूमिका राक्षे व त्यांच्या सहकार्यांनी घेतली, मात्र पाटील हे आपल्या म्हणण्यावर ठाम होते. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे संतप्त होऊन पाटील बाहेर निघाले होते, तेवढ्यात पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, पोलीस हवालदार सुधीर बनकर, आनंद गोसावी, सतीश साबळे, पोलीस नाईक अभयसिंह भोसले हे पोहोचले. त्यांनी दोघांबरोबर चर्चा केली. मंगळवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक एस. एल. पांढरे यांच्यासमोर बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
लक्ष्मी ऑरगॅनिक डिस्टलरीचे व्यवस्थापक एस. आर. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने जरंडेश्वर शुगर मिल्सकडून होणार्या अडवणुकीबाबत कोरेगावच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने दि. 9 ऑक्टोबर 2014 रोजी आदेश दिले असून, त्यामध्ये लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या ताब्यात असलेल्या डिस्टलरी प्रकल्प, कंपोस्ट यार्ड व वेस्ट वॉटर टँक या प्रकल्पांना कोणत्याही प्रकाराचे नुकसान न करता वाद असलेल्या मिळकतीभोवती कुंपण भींत बांधावी, त्याचप्रमाणे या मिळकतीत येणे-जाणेकरिता असलेल्या रस्त्यावर शुगर मिल्सला लोखंडी प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र शुगर मिल्सने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या प्रतिनिधींना व त्यांच्या वाहनांना, कर्मचार्यांना या मिळकतीत येण्या जाण्यासाठी हरकत अडथळा करु नये, अशी तूर्तातूत ताकीद दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत दिली आहे. शुगर मिल्स न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहे, याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
‘जरंडेश्वर’-‘लक्ष्मी’मध्ये वाहने तपासणीवरुन वादावादी
RELATED ARTICLES