अॅन्टिग्वा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विननं सेंच्युरी मारली. कोहलीची डबल सेंच्युरी आणि अश्विनच्या सेंच्युरीमुळे भारतानं पहिली इनिंग 566 रनवर घोषित केली. दुसर्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अश्विन पत्रकारांना सामोरा गेला.
मला आधीपासूनच पहिल्या 7 बॅटसमनमध्ये खेळायचं होतं. याआधीही मी तळाला येऊनही चांगली बॅटिंग केली होती. एवढी चांगली बॅटिंग करूनही मला कधी वरती बॅटिंगला पाठवण्यात आलं नाही, असं अश्विन म्हणाला आहे. अश्विनचं हे वक्तव्य म्हणजे भारतीय टेस्ट टीमचा माजी कॅप्टन धोनीवर निशाणा असल्याचं बोललं जात आहे.
धोनी कॅप्टन असताना बहुतेकवेळा सात बॅटसमन आणि चार बॉलर घेऊन मैदानात उतरायचा. त्यामुळे अश्विन आठ नंबरला बॅटिंगला यायचा. कोहली मात्र वेगळ्या रणनितीनं मैदानात उतरतो आहे. या मॅचमध्ये कोहलीनं सहा बॅटसमन आणि पाच बॉलर घेतले आहेत. सहा बॅटसमन असतानाही कोहलीनं अश्विनला विकेटकिपर सहाच्या वरती बॅटिंगला पाठवलं आणि अश्विननं कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत टेस्टमधली आपली तिसरी सेंच्युरी झळकावली. वरच्या नंबरवर बॅटिंगला पाठवल्यामुळे अश्विननं कोहली आणि कोच अनिल कुंबळेचे धन्यवाद मानले आहेत.