रावणाला सीतेचा मोह होता, तसाच मोह विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना माणचा मोह जडला आहे. मात्र जि.प.च्या आज झालेल्या अविश्वास ठरावाच्या वेळी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीला बहुमताचा 45 आकडा पार करता आला नाही. यामुळे अखेर मोठा झालेला फुगाच फुटला असे म्हटले तर रामराजेंचे नाव न घेता आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे. रावणाच्या अहंकाराने लंकेचा राजा झाला होता.
सातारा जिल्ह्यामध्ये नाव जरी राम असले तरी ते रावणाचेच काम करीत असतात. आमची लढाई ही रावणाच्या अहंकाराविरोधात आहे. गेल्या अनेक वर्षापासून या प्रवृत्तीच्या विरोधात माझी लढाई सुरू आहे. शिवाजीराव शिंदे हे त्यातीलच एक आहेत. तसेच तालुक्यामध्ये शिवाजीराव शिंदे यांचे काम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सुरू आहे. त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षात यावे म्हणून मदत केली नाही केवळ धडा त्या प्रवृत्तीला धडा शिकविण्यासाठी एकत्र आलो. माझी खुप मोठी ताकद आहे असा मोठा अहंकार त्यांना झाला होता. या अहंकाराचे विमान जमिनीवर आम्ही आणले आहे.
बाबांनी या लढाईबाबत निर्णायक भुमिका घेतली. उदयनराजे यांनीही त्याला साथ दिली आहे. दि. 2 ऑगस्ट रोजी महाराज सातार्यामध्ये आल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाच्या संदर्भात नवीन समिकरणाला सुरवात होईल. जी खदखद शिवाजीराव शिंदेंनी व्यक्त केली आहे अशीच खदखद राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार तसेच नेत्यामध्ये आहे. मी कोण तरी आहे ही प्रवृत्ती बळावत चालली होती. त्याच्या विरोधात आम्ही दंड थोपटले होते.
रामराजे अविश्वास ठरावाच्या विरोधातील जादुई आकडा पार करणार अशी चर्चा होती. मात्र त्यांची ही चर्चा फोल ठरली आहे. जिल्ह्याच्या हिताचे काम त्यांनी करावे. पदाची उंची ठेवण्याचे काम करावे. आता त्यांचे वय जास्त झाले आहे. आता त्यांच्याकडून कटकट सुरू आहे.
माझ्याशिवाय जिल्ह्यात कुणीच नाही ही भावना व भुमिकेला आम्ही आता चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे.