सातारा : चूकीच्या पध्दतीने माझ्या विरोधात जिल्हा परिषदेमधील शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व विधान सभेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरून खोटा सह्या घेवून अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावाच्या विरोधात मला सहानुभूती मिळण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, पक्षप्रतोद अविनाश फाळके, माजी जि.प. सदस्य किरण बर्गे, काँग्रेसचे नेते श्री. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी एक होऊन काँग्रेसच्या सदस्यांना तटस्थ रहाण्याची भुमिका घेतल्यामुळेच आज राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पराभव झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. मला जर पक्षातून चांगली वागणूक मिळाली नाही तर भविष्य काळात मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष बदलाबाबत योग्य भुमिका घेऊ अशी माहिती आज जि.प.चे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना कृषी सभापती शिवाजीराव शिंदे म्हणाले प्रत्येक वेळी माझ्या विरोधात कट-कारस्थान करण्यात आले. मात्र पापाचा घडा अखेर फुटल्याचेच आज झालेल्या अविश्वास ठरावानंतर दिसून आलेले आहे. चूकीच्या पध्दतीने माझ्या विरोधात राष्ट्रवादीच्या काही जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावाच्या अनुषंगाने मला सहकार्य करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, विरोधी पक्ष नेते अविनाश फाळके, जि.प. सदस्य दिपक पवार, पाटण विकास आघाडी, व आ.शंभूराजे देसाई गट, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्याशी मी संपर्क केलेला होता. मत फोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात आमिषे दाखविण्यात आली.
मात्र या आमिषाला बळी न पडता राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ भुमिका घेवून मला खर्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. स्व. आ. सदाशिवराव पोळ, (तात्या) यांच्या काळात त्यांच्या मुलालाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहानुभूती दाखविली नाही. यामुळे मी हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला. हा काय माझा गुन्हा आहे का? माझी लढाई आता सभागृहात स्पष्ट होणार होती. ती आता झालेली आहे. एकुणच व्हीप काढून मला पक्षातून निलंबन करण्यासाठी शिपायाची सही घेवून 6 वर्षासाठी बंदी केली आहे. वास्तविक मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहे. माझा पक्षाबरोबर कोणत्याही प्रकारचा लढा नसून पक्षातील स्वत:ला कर्ता-करविता म्हणणार्या नेत्यांच्या विरोधात माझा हा लढा आहे.