महाबळेश्वर : महाबळेश्वर येथून सुमारे पाच कि.मी अंतरावर श्री क्षेत्र महाबळेश्वर आहे. सह्याद्री पर्वतावर धोम महाबळेश्वर नावाची एक पर्वतरांग आहे. या डोंगरावर श्री क्षेत्र महाबळेश्वर हे ठिकाण आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे 1220 मीटर एवढ्या उंचीवर वसलेले आहे. येथेच सात नद्यांच्या उगमाचे मंदिर आहे. आमलकीच्या आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळांमधून सात नद्यांचा येथे उगम होतो. या ठिकाणापासून पाण्याचे स्त्रोत सुरु होतात. तिथे कुंडे बांधली आहेत. या सात जलप्रवाहांची नावे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री, गंगाभागिरथी आणि सरस्वती अशी आहेत. यातील कृष्णा, वेण्णा, कोयना आणि सावित्री या चार कुंडातून नित्य निरंतर जलप्रवाह सुरु असतो. सरस्वती नदी ही सदैव गुप्त रुपाने वास करुन असते. त्यामुळे तिच्यातील प्रवाह दिसत नाही. गायत्री कुंडातून साठ वर्षातून एकदाच कपिलाषष्ठीच्या योगावर जलप्रवाह येतो. गायत्रीचे दर्शन एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकदाच होऊ शकते.

गंगा भागिरथी कुंड सतत अकरा वर्षे कोरडे असते. त्यातून पाण्याचा एकही थेंब येत नाही. मात्र गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केला की अचानक गंगाभागिरथी प्रवाहातून जलस्त्रोत सुरु होतो आणि तो सतत वर्षभर सुरु राहतो. गुरु कन्या राशीतून बाहेर पडला आणि त्याने तूळ राशीमध्ये प्रवेश केला की पुन्हा गंगेचा प्रवाह कोरडे पडते. पुन्हा पुढची अकरा वर्षे ते पूर्णत: कोरडे राहते. बारा वर्षांनंतर गुरुने कन्या राशीमध्ये पुन्हा प्रवेश केला की गंगा कुंडातून जलप्रवाह सुरु होतो. हाच गुरुवारचा येथील कन्यागत पर्वकाळ. याची सुरुवात आमदार मकरंद आबा पाटील, सौ.अर्चना पाटील, श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानचे तर्फे वाई अॅड. श्रीनिवास कुलकर्णी, सौ. सुवर्णा कुलकर्णी तसेच पंचगंगा मंदिराचे पुजारी कै. कृष्णाबाई दगडू लांगी यांच्या वारस हक्काने पाळीदार पुजारी सखाराम पांडुरंग केळगणे व सौ. वत्सलाबाई केळगणे या मानाच्या तीन दाम्पत्यांच्या हस्ते श्री कृष्णा – भागीरथी उगमस्थानाचे मंत्रोपचाराच्या जय घोषात षोडशोपचारे पूजन व दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील जेष्ठ बाळकाका महाबळेश्वरकर, संजय दीक्षित, संतोष महाबळेश्वरकर, प्रमोद महाबळेश्वरकर, सुहास महाबळेश्वरकर, अनिल महाबळेश्वरकर, ओंकार दीक्षित आदी ब्रम्हवृन्दांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सर्व मान्यवर व भक्त गणाच्या हस्ते पंचगंगा कुंडात पंचगंगेचे सामुदाईकपणे पूजन, महाआरती करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी कृष्ण-भागीरीतीचा जयघोष केला. यामुळे सारा परिसर दुमदुमून गेला होता. असंख्य भाविकांनी यावेळी पंचागंगेतील तीर्थात स्नानाचा लाभ घेतला. प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली. या उत्सवासाठी येथिल श्री क्षेत्र महाबळेश्वर पंचगंगा मंदिर ट्रस्ट, श्री श्रेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांनी योग्य नियोजन केले होते. चोख पोलीस बंदोबस्त व आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा ठेवण्यात आली होती