केळघर ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पजर्न्यवृष्टीमुळे रेंगडी व मुकवली माची, येथील भातखाचरे पाण्याने तुडुंब भरल्याने भातशेती गाडलेली आहे तर रेंगडी गावाकडे जाणारा रस्त्याला मधोमध मोठी भेग पडल्याने हा रस्ता खचू लागला आहे. हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढू लागले तर मेढा-महाबळेश्वर रस्त्याला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभाग दुघर्टना झाल्यावरच उपाययोजना करणार कार्य असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
रेंगडी व आजूबाजूच्या गावात पावसाचे प्रमाण जास्त असते. परिसरात गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण वाढू लागल्याने डोंगरांवरील पाण्याचा विसर्ग मेढा-महाबळेश्वर रस्त्याकडे व रस्त्याखालील डोंगरउतारावरील गावांतील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानीत शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
दरम्यान रेंगडी येथील खचलेल्या रस्त्याच्या जागी दोन वर्षापूर्वी भूस्लखन झाल्यामुळे मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. त्यावेळी माळीणसारखी दुर्घटना होण्याची परिस्थिती उद्भवली होती.
यावेळी महसूल व बांधकाम विभागाने यावर कोणत्या उपाययोजना केल्या त्यांचा अहवाल अजूनही लालफितीत अडकला असून यावर गांभीर्याने केव्हा विचार होईल? असा सवाल नागरिक विचारत आहे.
जोरदार पावसामुळे परिसरातील गावांमध्ये ओढ्याच्या दोन्ही बाजूंच्या भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. येथील शेतकरी हा मुख्यतः भातशेतीवरच अवलंबून आहे. मात्र पावसाने भातशेती पूणर्पणे गाडल्याने या शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच भातशेतीत ताली, बांध वाहून गेल्याने भविष्यात बांधबंदीस्तीचा यक्ष प्रश्नही शेतकर्यांना पडला आहे. यासाठी शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.