Friday, March 28, 2025
Homeकृषीकृष्णा’ नोटराईज्ड वाहतूक ई-करार करणारा राज्यातील पहिला कारखाना

कृष्णा’ नोटराईज्ड वाहतूक ई-करार करणारा राज्यातील पहिला कारखाना


चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते शुभारंभ; बोगस करारांना बसणार आळा
शिवनगर : येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने जुन्या वाहतूक करारपक्रियेला फाटा देत अत्याधुनिक नोटराईज्ड पद्धतीने तोडणी वाहतूक ई-करार राबविण्यास प्रारंभ केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नुकताच वाहतूक करारांचा शुभारंभ करण्यात आला. अशापद्धतीने अत्याधुनिक तोडणी वाहतूक ई-करार पद्धती राबविणारा कृष्णा कारखाना राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरला आहे.
कृष्णा कारखान्यात यापूर्वी राबविण्यात येणार्‍या जुन्या करार प्रक्रियेत त्रुटी असल्याने तोडणी वाहतूकीमध्ये बोगस करारांचे प्रमाण अधिक होते. यामुळे कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारखान्याने प्रथमच अत्याधुनिक तोडणी वाहतूक ई कराराचा अवलंब करण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकियेत करार करणार्‍या कंत्राटदार व त्याच्या जामीनदारांची कागदपत्रे घेऊन त्यांचे छायाचित्रासह बोटांचे ठसे संगणकीकृत प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहेत. तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकृत शासकीय नोटरीकडून नोटराईज्ड केली जाणार आहे. यामुळे तोडणी प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार्‍या जबाबदार लोकांची सर्व माहिती संगणकीकृत पद्धतीने नोंदविली जाणार असल्याने बोगस करारांना आळा बसून, करारप्रक्रियेत सुसूत्रता व पारदर्शकता येणार आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजीराव पाटील, संचालक जगदीश जगताप यांच्या हस्ते आनंदराव भिमराव माळी (रेठरे हरणाक्ष), हिंदुराव पांडुरंग पाटील(कोळे), मनोजकुमार दिनकर पाटील (नेर्लें), लक्ष्मण दत्तात्रय पाटील (नांदगाव) यांना करार वाटप करण्यात आले.
दरम्यान, कृष्णा कारखान्याने यंदापासून मोबाईल अ‍ॅपद्वारे ऊस नोंदणी प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला असून, या कामी शेती विभागातील कर्मचार्‍यांना अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलचे वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, ब्रिजराज मोहिते, गिरीश पाटील, सुजीत मोरे, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, विनायक भोसले, कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, ईडीपी मॅनेजर अवधूत रेणावीकर, केनयार्ड सुपरवायझर व्ही. वाय. पाटील, वित्त अधिकारी सी. एन. मिसाळ यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, वाहतूक कंत्राटदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular