Wednesday, March 19, 2025
Homeक्रीडाविराट विक्रम... कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलं वहिलं द्विशतक!

विराट विक्रम… कर्णधार कोहलीनं ठोकलं पहिलं वहिलं द्विशतक!

अँटिग्वा : अँटिगा कसोटीवर टीम इंडियानं आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. विराटचं द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारतानं पहिला डाव आठ बाद 566 धावांवर घोषित केला. तर दुसर्‍या दिवसअखेर वेस्ट इंडिजला एक बाद 31 धावांची मजल मारता आली आहे.
भारतीय क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीनं रचला नवा विक्रम. परदेशात द्विशतक ठोकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिलदेव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या रथीमहारथी कर्णधारांनाही आजवर अशी कामगिरी करता आलेली नाही. पण विराटनं अँटिगा कसोटीच्या दुसर्‍या दिवशी द्विशतक करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
विराटनं 283 चेंडूंत 200 धावांची खेळी 24 चौकारांनी सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच द्विशतक ठरलं.
कोहलीच्या या विराट खेळीनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे कोहलीनं द्विशतक ठोकलं, तो क्षण कॅमेर्‍यात कैद करताना दिसला.
कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा विराट कोहली हा
आजवरचा पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि धोनीनं कर्णधार या नात्यानं कसोटीत द्विशतक झळकावलं होतं. पण ही सर्व द्विशतकं भारतात ठोकली होती. अँटिगात द्विशतक करुन विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बारा हजार धावांचाही टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा आठवा भारतीय खेळाडू ठरला.
गेल्या काही वर्षांत विराटनं भारतात आणि भारताबाहेरही भरीव कामगिरी बजावली आहे. मग ऑॅस्ट्रेलिया असो किंवा दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड असो वा श्रीलंका देशात आणि
परदेशातही विराटनं आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आहे. अँटिगा कसोटीत विराटनं कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. विराटनं शिखर धवनच्या साथीनं 105, रहाणेच्या साथीनं 57 आणि अश्विनच्या साथीनं 168 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाला कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत करुन दिली.
अँटिगाच्या खेळपट्टीवर विराटसह रवीचंद्रन अश्विननंही वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले आणि कसोटी कारकीर्दीतलं आपलं तिसरं शतक साजरं केलं. अश्विननं 253 चेंडूंत 12 चौकारांसह 113 धावांची खेळी उभारली. अश्विनचं कसोटी कारकीर्दीतलं हे तिसरं शतक ठरलं.
अँटिगातल्या या सामन्यात अश्विन सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. याआधी अश्विननं कधीही सहाव्या स्थानावर फलंदाजी केली नव्हती. पण कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेनं दाखवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवून दाखवला.
विशेष म्हणजे अश्विननं आपली तिन्ही कसोटी शतकं ही वेस्ट इंडिजविरुद्धच झळकावली. त्यामुळं एक ऑॅफस्पिनर म्हणून सर्वांना परिचित असलेला आर अश्विन आता पॉली उमˆीगर, चंदू बोर्डे, दिलीप सरदेसाई, मोहिंदर अमरनाथ, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू, सचिन तेंडुलकर या दिग्गजांच्या पंक्तित जाऊन बसला आहे. कारण या सर्वांनी वेस्ट इंडिजविरुद्ध तीन शतकं झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे.
विराटचं द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं आपला पहिला डाव आठ बाद 566 धावांवर घोषित केला. भारतानं केलेल्या 566 धावांचं दडपण वेस्ट इंडिजवर चांगलंच दिसून आलं. त्यामुळं आता तिसर्‍या दिवशी विराटच्या टीम इंडियासमोर विंडीजला लवकरात लवकर गुंडाळण्याचं आव्हान असेल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular