कराड, ता. 12 : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने प्रतिटन 3000 रूपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. सन 2017-18 या हंगामात गाळप होणार्या ऊसाला प्रतिटन 3000 रूपयांप्रमाणे पहिली उचल अदा करण्यात येणार असून, लवकरच ही रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर 2 लाख 17 हजार 560 मेट्रीक टन गाळप केले असून, सरासरी साखर उतारा 11.52 टक्के राहिला आहे. तर जयवंत शुगर्सने आजअखेर 1 लाख 65 हजार 910 मेट्रीक टन गाळप केले असून, सरासरी साखर उतारा 11.56 टक्के राहिला आहे. कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्स या दोन्ही कारखान्यांनी नेहमीच ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गेल्या हंगामातही कृष्णा कारखान्याने मोफत साखरेसह उच्चांकी दर देत राज्यात सहकारी साखर कारखानदारीत दरामध्ये आघाडी घेतली होती. शिवाय जयवंत शुगर्सनेही उच्चांकी दर देण्याची परंपरा राखली होती. हीच परंपरा यंदाही अबाधित राखत या हंगामातही दोन्ही कारखान्यांनी पहिली उचल म्हणून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच हे पैसे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील, असे डॉ. भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.