सातारा : सातारा जिल्हा नगर परिषद, नगर पंचायत कामगार संघर्ष समितीतर्फे कामगारांच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या महागाईला व बेरोजगारीला आळा घालावा, किमान वेतन कंत्राटी कामगारासहीत 18 हजार जाहीर करा. सर्व कामगार कर्मचार्यांना व बेकारांना पेन्शन द्यावी, सातारा पालिका मुख्याधिकारी समवेत त्वरीत बैठक घ्यावी, कु भारती मंडलीक यांना म्हसवड पालिकेत न्याय मिळाला आहे उपविभागीय अधिकारी फलटण यांनी 113 पानी अहवाल पाठविला आहे त्याचे काय झाले? अनुकंपाच्या जागा भरताना ठेवलेल्या जाचक अटी शिथील कराव्यात. लाड, पागे कमिटीच्या शिफारशी कर्मचार्यांना लागू कराव्यात. पालिका कर्मचार्यांना घरे बांधून द्यावीत, पदबदल, पदोन्नती, सेवाज्येष्ठतेप्रमाणे भरावीत, कर्मचार्यांना 7 तारखेच्या आत पगार द्यावेत. कामगार कर्मचार्यांनी वशिलेबाजी केल्यास, मुख्याधिकार्यांनी त्यास शासन करावे, यासह अनेक प्रलंबीत मागण्यांबाबत पालिका कर्मचार्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. तसेच यावेळी मोर्चामधील आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांच्याविरूध्द प्रतिबंधात्मक करून सोडून देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कामगार युनियनचे सरचिटणीस कॉ. शिवाजीराव पवार, अशोक लोखंडे, राजेश काळे, दिलीप भोसले, संघटक श्रीरंग घाडगे, बाळू शिंदे, कामगार युनियन सदस्य अरविंद दामले, मनोहर शिंदे, नंदु साठे, शेखर कांबळे, मिलींद पवार, अमोल लाड, कॉ. शामराव चिचणे, राजकुमार माने, किशोर कांबळे, शंकर हिरवे, उमेश भिलारे, सोमनाथ चव्हाण, शंकर भोसले यांनी केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.