सातारा : एलईडी टेंडरची फाईल सातारा नगर पालिकेतून गायब झाले असल्याचे उघड सर्वसाधारण सभेत झाली होती. संबंधित अधिकारी साळुंखे यांना निलंबीत करावे अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. या मागणीचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी गंभीर दखल घेत विद्युत विभागाला फाईल तात्काळ शोधा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी तंबी त्यांनी अधिकार्यांना दिली.
सातारा पालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराची सत्ताधारी पदाधिकार्यांनी लक्तरे काढीत शहरातील अनेक भागात पथदिवे बंद आहेत. तक्रार करूनही पालिकेचे विद्युत अभियंता सुर्यकांत साळुंखे कामे करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम पुर्ण झाले नसताना 30 लाखाची बिले ठेकेदाराला देवून त्या टेंडरची फाईलच पालिकेतून गायब होते याचा कोणताही मागमूस होत नाही. असे अनेक प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित करून पालिकेची सर्वसाधारण सभा वादळी गेली. यावेळी मुख्याधिकारी संबंधित विभागाची चौकशी करतो असे आश्वासन सभागृहात नगरसवेकांना दिले.
मुख्याधिकारी गोरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत विद्युत विभागाचे अभियंता साळुंखे व कर्मचारी यांना धारेवर धरत येत्या सात दिवसात संबंधित टेंडरची फाईल शोधून काढा, अन्यथा संपुर्ण विभाग कारवाईसाठी तयार रहा अशी तंबी दिली. मुख्याधिकारी गोरे यांच्या या ईशाराने पालिकेतील विद्युत विभागात खळबळ माजली आहे.