Saturday, March 22, 2025
Homeठळक घडामोडीएलईडी खरेदीप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे सर्वसाधारण सभेत ‘दिवे’

एलईडी खरेदीप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे सर्वसाधारण सभेत ‘दिवे’

सातारा : सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज अत्यंत वादग्रस्त ठरली. या सभेमध्ये कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी टार्गेट करून थेट ‘डायसवर’ चढून त्यांच्या अंगावर जाण्याचा केलेल्या प्रयत्नामुळे सभागृहात प्रथम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. एकुणच सुमारे पाऊणतास ही सभा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक होऊन विषय पत्रिकेवरील सर्वच्या सर्व 15 विषयांना रेटून मंजूरी दिली. याला राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांनी प्रखर विरोध करत टीकेची झोड उडवून दिली.
 सातारा जिल्हा परिषदेच्या छ. शिवाजी सभागृहात जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व साधारण सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष रवि साळुंखे, महिला व बाल कल्याण सभापती समाज कल्याण सभापती, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी देशमुख,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास यांची विशेष उपस्थिती होती.
 प्रारंभी कामथी तर्फ सातारा येथील शहिद जवान, महाड दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्ती जाळगेवाडी ता.पाटण येथील शहीद जवान यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर विषय पत्रिकेचे वाचन करण्यास प्रारंभ करण्यात आला. याला आक्षेप घेवून काँग्रेसचे सदस्य जयवंत जगताप म्हणाले, शिक्षण सभापती सतीश चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्या सुरेखा पाटील यांचा केलेल्या अपमान प्रकरणी आधी माफी मागावी,नंतरच सभा सुरू केली जाईल असे स्पष्ट केले. यावर कुणाच्या सांगण्यावरून ही सभा सुरू होत नसते. कायद्याच्या चौकटीत राहून सभा सुरू असते असे सदस्य अनिल देसाई यांनी त्यांना ठणकावून उत्तर दिले. यानंतर सुमारे तीस ते  चाळीस मिनीटे सभागृहात सदस्यांचा धुमाकुळ सुरू होता. या वादळात विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. यानंतर ऐन वेळच्या विषयावर सदस् अनिल देसाई यांनी हात घालून माण तालुक्यातील शेनवडी येथे बोगस फोटोग्राफ तयार करून चूकीच्या पध्दतीने बिले काढली आहेत. यातील दोषींवर कारवाई करावी म्हणून मागणी केली. सभागृह लोकशाही मार्गाने चालते,मी बोललो तसे चालले पाहिजे ही भुमिका चूकीची आहे असेही देसाई यांनी ठणकावले. यावेळी उपाध्यक्ष रवि साळुंखे म्हणाले ठराव काम मांडला तो पुन्हा वाचून सांगावा असे स्पष्ट केले. मात्र त्याची गरज नसल्याचे देसाई यांनी सांगितले.  सीईओ साहेबांनी खुलासा करावा तसेच दोषींची चौकशी करण्याचे अध्यक्ष सुभाष नरळे यांनी सांगितले. जि.प. सदस्य संदीपभाऊ शिंदे म्हणाले, अध्यक्ष नरळे यांच्या शिक्षण संस्थेत बारा वर्षे सेवा केलेल्या दलित समाजाच्या शिक्षकावर अन्याय केला आहे त्याला सेवेत सामावून घ्यावे असे स्पष्ट केले. मात्र, जो विषय सभागृहात येत नाही, त्याच्यावर चर्चा करू नये, असे सदस्य देसाई यांनी सांगितले. सन 2015-16 मध्ये लाखो रूपयांची कामे झालेली दाखवून बोगस बिले काढली आहेत. यामध्ये सीईओ निवास, शिक्षणाधिकारी या प्राथमिक कृषी सभापती निवास, जि.प. उपाध्यक्ष कार्यालय रंगरंगोटीसह मोठ्या प्रमाणात खर्च दाखवून पैशाची उधळपट्टी झाल्याचा आरोप सदस्य जीतू सावंत यांनी केला. ऐन वेळा तुम्ही यादी काढून वाचत असता त्याचा खुलासा कोण करणार असे उलट उत्तर उपाध्यक्ष रवि साळुंखे यांनी दिले. तसेच या प्रकरणी सीईओ चौकशीचे आदेश करावेत, असे अध्यक्ष नरळे यांनी आदेश दिले. कढणे गावात पुल उभारावा अशी मागणी सदस्य देसाई यांनी केली. एल.ई.डी. दिवे निविदा काढताना कमी किंमतीची निविदा का घेतली नाही याचे उत्तर कृषी सभापती शिंदे यांनी द्यावे, अशी मागणी सदस्य राजू भोसले यांनी केली. या विषयावरून वादळी चर्चा होत असतानाच थेट राष्ट्रवादीचे सदस्यांनी आपले आसन सोडून थेट कृषी सभापती शिंदे यांना टार्गेट करत डायस गाठले व त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न झाला. पक्षप्रतोद व ज्येष्ठ बाळासाहेब भिलारे, सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, नितीन भानगुडे-पाटील यांनी शिवाजीराव शिंदे यांना शांत राहण्याचे आवाहन करून राष्ट्रवादीच्या आक्रमक झालेल्या सदस्यांना हाटकून परिस्थिती आटोक्यात आणली. यानंतर तणावाच्या वातावरणात सभा संपल्याचे जाहिर करण्यात आले.
सुड उगविण्याच्या दृष्टीने माझ्यावर केलेले कटकारस्थान : शिंदे
सातारा जिल्हा परिषदेमधील माझ्या विरोधातील अविश्‍वास ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीची झालेली नाचक्की, यांचे शल्य मनात ठेवून राष्ट्रवादीच्या सभागृहातील काही सदस्यांनी माझ्या विरोधात कुभंाड रचून कृषी विभागात ताडपदरी ‘इ निविदा’ व एल.ई.डी. दिवेबाबत जादा रक्कमेची निविदा ठेवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप धांदात खोटा आहे. तसेच माझ्यावर सुड उगविण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आहे अशी माहिती कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular