सातारा : राष्ट्रवादीच्य बालेकिल्ल्याला कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्या अविश्वास ठरावाने मोठा सुरुंग लावला. या सुरुंगाची दारु पेरण्याचे काम काँग्रेसने इमाने-इतबारे केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जिल्ह्यात राजकीय फुगा फुटला. हे अविश्वास नाट्य शांत होण्याचे नाव घेईनासे झाले असून त्याची खद्खद शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभेत निघाली. या अंतर्गत अशांततेचा राजकीय फायदा उठवण्याच्या दृष्टीने काँग्रेसने सहानुभूतीचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादीतल्या नाराजांना पाठींबा देण्याचे धोरण ठेवून जिल्हा परिषदांच्या विविध गटांमध्ये हेच मोहरे राष्ट्रवादीच्या विरोधात कसे वापरता येतील याची रणनिती आता सुरु झाली आहे. अर्थातच या गोपनीय हालचालींना दुजोरा मिळणार नसल्याने काँग्रेसच्या गोटात सर्वांना चुप्पी साधली आहे. काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात कराड दक्षिणचे पृथ्वी क्षेपणास्त्र रोखल्याने राष्ट्रवादीलाही बालेकिल्ल्यात अब्रु वाचवण्यासाठी फलटणचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. सध्या राष्ट्रवादीची अवस्था धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी झाली आहे. आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गट निहाय बैठकांमधून राष्ट्रवादीला तगडी टक्कर देऊ शकणारे उमेदवार शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला अंतर्गत राष्ट्रवादीतल्या नाराजांची कशी साथ मिळवता येईल. यासाठी बेरजेचे राजकारण सुरु झाले आहे. आ. जयकुमार गोरे व खा. उदयनराजे भोसले गट यांनी युती करुन राष्ट्रवादीची पक्की जिरवली. जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, उपाध्यक्ष रवी साळुंखे, कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी चांगलाच डुख धरला आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना सहानुभूती देण्याचे धोरण ठेवले आहे. या धोरणामागे काँग्रेसच्या गळा कोण लागू शकेल याची चाचपणी गोपनीयरित्या सुरु झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सातार्याच्या शासकीय विश्रामगृहात पुणे-कराड दौर्या दरम्यानचा मुक्काम वाढवल्याने राष्ट्रवादीच्या भुवया सुध्दा उंचावल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खासदार गट काँग्रेसची हात मिळवणी करणार अशी चर्चा आहे.