कराड : तालुक्यातील वनवासमाची येथील शिवारातील रानात बिबट्याचे मादी असलेले बछडे विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. सदरची घटना पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. बिबट्या मृत्यूमुखी पडल्याची बातमी समजताच वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थानी दाखल झाले. त्यांनी या घडलेल्या घटनेचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला व त्याच्यावरील पुढील सोपस्कर आटोपले.
या बाबत घटनास्थळावरुन नागरिकांतून मिळालेली माहिती अशी काल रात्रीच्या वेळी बिबट्याचे बछडे वनवासमाची लगतच्या डोंगरातून गावच्या शिवारात आले असावे. गावच्या शिवारात गरुड यांची शेतजमिन आहे. त्यांच्या रानाच्या लगत झाड आहे.
या झाडाच्या फांदीवर बिबट्याचे बछडे चढले होते. त्याने खाली उतरण्यासाठी झाडाच्या फांदीवरुन उडी टाकण्याचा प्रयत्न केला असावा व तो रानातील झाडाच्या शेजारून गेलेल्या विज वितरणच्या विज तारात तो अडकून त्यास शॉक बसला असावा व त्यातच त्याचा मृत्यू झाला. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या घटनेची माहिती वनखात्याचे अधिकारी व कर्मचार्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून मृत बछड्याची उत्तर तपासणी केली व बछड्यावरील पुढील सोपस्कर आटोपले.