दक्षतेसाठी प्रशासनाने पॉईंट बंद केले असताना महाबळेश्वर बंदची पसरवली जात आहे अफवा
महाबळेश्वर : सोशल मिडीया आणी चॅनेलवाल्यांच्या अती घाई, अपूर्ण माहिती व टि. आर.पी वाढविण्याच्या नादात विनाकारण शहरांबाबत चूकीचे गैरसमज निर्माण होत असून प्रवाश्यांना व पर्यटकांना विनाकारण खात्री करण्यासाठी वेळ वाया घालवत बसण्याची वेळ येत असून त्यांचा नाहक खोळंबा होत आहे.
महाबळेश्वर देशातील सुप्रसिध्द व महाराष्ट्रातील चेरापुंजी समजले जाणारे प्रसिध्द पर्यटनस्थळ आहे. सध्या पावसाळा असल्याने पर्यटक येथे पाऊस बघण्यासाठी व मनसोक्त भिजण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे शनिवार रविवार अश्या सुट्ट्यांच्या दिवसात पर्यटकांची गर्दी होत असते. पावसाळ्यात नेहमीच येथिल बाजारपेठे व्यतिरिक्त पश्चिमेकडील सर्वच पॅाईंट हे पावसाळी हंगामात बंद ठेवले जातात. कारण या सर्वच पॅाईंटवर मोठ्या प्रमाणात दाट धुके असल्याने या परिसरात काहीच दिसत नाही. तसेच या वर्षी नुकतीच हवामान खात्याने दिलेला दक्षतेच्या ईशार्याने येथिल निसरडे झालेले पॅाईंट हे प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जो त्यांनी जाहीर केला. परंतू त्याचा वेगळा अर्थ काढून अनेक प्रसारमाध्यमांनी खात्री न करता महाबळेश्वर बंद असे जाहीर केल्याने येणार्या पर्यटकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली व खात्री करण्यासाठी अनेक स्थानिक नागरिकांना फोन येऊ लागले. तसेच सोशल मिडीयावर देखिल बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून मोटारसाईकल वाहून गेल्या व दुकानांमध्ये पाणी शिरल्याची चित्रफित प्रसारित झाली व ती महाबळेश्वर बाजारपेठेची असल्याचा उल्लेख झाल्याने अनेक पर्यटकांमध्ये गैरसमज पसरले व महाबळेश्वरची विनाकारण बदनामी होत असल्याचे लक्षात आले. हि चित्रफित देखिल केवळ महाराष्ट्रात नाही तर शेजारच्या गुजरात राज्यात देखिल प्रसारित झाली. याबाबत सोशल मिडीयावर अनेकांनी खोटी बातमी असल्याचे माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतू अशा अफवांवरुन काही अती उत्साही पत्रकारांनी आपल्या चॅनेलची टि.आर.पी वाढविण्यासाठी महाबळेश्वर संपुर्ण बंद असल्याची खोटी व चूकीची माहिती प्रसारित केल्याने पर्यटकांमध्ये गैरसमज पसरण्यात वेळ लागला नाही.
वास्तविक महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस हा नविन नाही. गेली अनेक वर्षे झाले महाबळेश्वरला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर काही काळापुरते पाणी येते, वेण्णालेक परिसर पाण्याखाली जातो, काही प्रमाणात घाटांमध्ये दरड कोसळते हे प्रकार नित्यांचेच आहेत. तसेच सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात नेहमीच पॅाईंट बंद असतात. अनेक पर्यटक येथे आले तरी, पॅाईंटपेक्षा बाजारपेठेतच फिरण्याची मजा घेत असतात. परंतू याबाबत आज पर्यंत माहिती प्रसारित न झाल्याने व अचानक चुकीची माहिती प्रसारित झाल्याने नाहक गैरसमज पसरला गेल्याने स्थानिकांचा विनाकारण व्यावसायिक तोटा होत आहे.
याचबरोबर स्थानिक प्रशासनाने देखिल खबरदारीच्या उपाय योजना म्हणून अतिवृष्टीच्या ईशार्यामुळे सुरु असलेले काही पॅाईंट तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अनेकवेळा घाटातील धबधब्यांमध्ये पर्यटक देखिल भिजताना विनाकारण धोका ओठवून घेतात. बंदी केल्यास मुद्दाम तिथे जाऊन जिव धोक्यात घालून धबधब्याखाली उतरण्याचा प्रयत्न करित असतात. अनेकवेळा जबरदस्तीने बंदी करता येत नाही त्यामुळे प्रशासन तो पॅाईंटच बंद करण्याचा निर्णय घेत असते. त्यामुळे पर्यटकांनी देखिल आपली आचारसंहिता पाळल्यास येथे दर्घटना घडण्याची शक्यताच नाही. तसेच येथिल महसूल खाते, पोलिस यंत्रणा, सार्वजणिक बांधकाम विभाग, वन विभाग व नगरपालिकेने चोख बंदोबस्त ठेवला असून खबरदारीच्या सर्व उपाय योजना येथे करण्यात आल्या आहेत. स्थानिकांनी व पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास येथे कोणतीही आपत्ती होणार नाही अशी ग्वाही अधिकार्यांनी दिली आहे.