Monday, May 19, 2025
Homeताज्या घडामोडीप्रत्येकांनी मतदान करुन, मतदानाचा टक्का वाढवावाः श्वेता सिंघल

प्रत्येकांनी मतदान करुन, मतदानाचा टक्का वाढवावाः श्वेता सिंघल

सातारा : 43- माढा व 45- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 23 तारखेला मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत जिल्ह्यातील यात सातारा लोकसभा मतदार संघ आणि माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण व खटाव यांचे मिळून 25 लाख मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल बोलत होत्या. या पत्रकार परिषदेतला अपर जिल्हाधिकारी तथा आचासंहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीएलओमार्फत घरोघरी मतदान स्लीपा पुरविण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पुढे म्हणाल्या, मतदानाच्या स्लीपमागे मतदानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मतदानाच्यावेळी मतदारांनी आपला मोबाईल घरीच ठेवून यावे. मतदारांकडे जर मतदान ओळखपत्र नसेल तर आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, शासनाने दिलेले ओळखपत्र, पेन्शनचे कागदपत्र, पोस्टाचे व बँकेचे पासबुक, पासपोर्ट असे ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.
मतदानाच्या 48 तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिल रोजी वृत्तपत्रात उमेदवारांना जाहिराती देता येतील. या जाहिराती माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जमावबंदी आदेश तसेच प्रचारासाठी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या व्यक्तींना जिल्हा सोडण्याचे आदेशही काढण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
जिल्ह्यातील एकही दिव्यांग मतदान मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 15 सुविधा देण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना, गर्भवती महिलांना व वयोवृद्धांना रांगेत उभे न करता थेट मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या महिलांची मुले लहान आहे, अशा महिलांच्या मुलांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, या मुलांना संभाळण्यासाठी आशा कार्यकर्ती यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील डमी मतपत्रिका ठेवण्यात येणार असून त्याद्वारे त्यांना मतदान करता येणार आहे. तसेच ज्यांची दृष्टी कमी आहे, अशा मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर भिंगाची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रणेबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या जनजागृतीमध्ये 80 हजार लोकांनी मतदानाचे प्रात्यक्षिक करुन पाहिले आहे, यावेळी सुमारे सव्वा लाख नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण 301 मतदान केंद्रांवर लाइव्ह वेबकास्टींगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रकियेसाठी 1 हजार 103 वाहने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये 5 लाँचचाही समावेश आहे. मतदारांना काही अडचणी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच सहायक निवडणूक अधिकारी यांच्या वाई (02167-227744), कोरेगाव (02163-221300), कराड उत्तर (02164-221378), कराड दक्षिण (02164-221378), पाटण (02372-283122), सातारा (02162-234395), फलटण (02166-222386)व माण (02165-220161) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी पत्रकार परिषदेत शेवटी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular