मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडणार
सातारा : माझ्या राजकीय कारकिर्दीला क्रांतीकारकांचा जिल्हा असणार्या सातार्याने नेमहीच मोठे बळ दिले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सातार्यात आल्यानंतर मला अगदी आईच्या कुशीत आल्यासारखे वाटत आहे. सातारा जिल्ह्यातील बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजनांचा अजेंडा राज्य शासनाकडून राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली. त्यांचा विश्वास सार्थ करुन दाखवणार असल्याचे भावपूर्ण उद्गार फलोत्पादन, पाणी पुरवठा, ग्रामीण स्वच्छता, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले. पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला खोत यांचे सहपालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रथमच त्यांनी सातार्याला भेट दिली.
राजकीय व्यस्ततेतही त्यांनी दै. ग्रामोध्दारच्या कार्यालयात भेट देऊन कार्यकारी संपादक अजितसिंह जाधव यांच्याशी मनमोकळ्या अनौपचारीक गप्पा मारल्या. यावेळी ग्रामोध्दार परिवाराचे जेष्ठ सदस्य आनंदराव हेळकर, अतुल देशपांडे, उपसंपादक एकनाथ थोरात यावेळी उपस्थित होते. सदाशिव खोत यांनी दै. ग्रामोध्दारच्या सामाजिक बांधिलकीचे आवर्जुन कौतुक करत सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रशासनाला बरोबर घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी महाराष्ट्रात सधन व शेतमालाची अचूक जाण असलेला समजला जातो. मात्र गेल्या काही वर्षात अवर्षणामुळे शेतकर्याची अवस्था प्रचंड वाईट झाली आहे त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दराची वेळोवेळी आंदोलने करुन राज्य शासनाला जाग आणण्याची जबाबदारी खा. राजू शेट्टी यांच्या सहकार्याने आम्ही पार पाडत होतो. मी सत्तेत आलो तरी माझे पाय जमिनीवरच आहेत. मुळाचा मी कार्यकर्ता असून शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणे हीच माझी बांधिलकी आहे. शेतकर्याच्या शेतमालावर दलाली करणार्यांना बाजूला करुन त्यांचा माल थेट परदेशात पोहोच करुन दोन पैसे शेतकर्याच्या हातात कसे पडतील यासाठी सावता माळी मार्केट योजना आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर लगेच सुरु केली आणि मुंबईत त्याचा सकारात्मक परिणाम दिसूनही आला. सातार्यातही मी याच पध्दतीने काम करणार असून पालकमंत्री विजयबापू शिवतारे हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही दोघे मिळून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सहकार्याने मार्गी लावणार आहोत. आजचा दिवस या मातीतला सत्कार हा मला आईच्या मायेचा सत्कार वाटतो. इथल्या मातीनेच माझ्यातील कार्यकर्त्याच्या संघर्षाला बळ दिले. सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळात दिवसभर होती. या प्रश्नावर त्यांना छेडले असता ते म्हणाले, ज्यांनी माझ्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवल्या आहेत. त्यांचे मनसुबे कदाचित वेगळे असतील. माझ्या भाजप प्रवेशावर खा. राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे मी वेगळे काही बोलणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या जो विश्वास दाखवला आहे तो मला शेतकर्यांसाठी सचोटीने काम करुन सार्थ करायचा आहे. असल्या चर्चांना माझ्याकडे स्थान नाही आणि त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे सदाभाऊ यांनी सांगत भाजप प्रवेशाच्या वावड्यांचा इन्कार केला.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यकारी संपादक अजितसिंह जाधव यांना सदाशिवभाऊ खोत यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या. व संपादक बापूसाहेब जाधव यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांनाही आपल्या भावना कळवल्या. गेल्या 80 वर्षापासून ग्रामोध्दारने विश्वासार्ह पत्रकारितेची जबाबदारी सचोटीने पार पाडली आहे. या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.