सातारा-सातारा शहरात पालिकेच्या वतीने 15 मे पूर्वीच रस्त्यांची कामे उरकण्यात आली. यासाठी विविध फंडातून पालिकेचे कोट्यवधी रूपये खर्ची घातले. परंतु एमजीपी आणि पालिका यांच्यात अंतर्गत समन्वय नसल्याने गळती काढण्यासाठी आणि नवीन नळ कनेक्शन देण्यासा मोठ्या प्रमाणात रस्त्याची खुदाई करण्यात आली होती. दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यात खड्डा कि खड्डयात रस्ता असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रवास करताना सातारकरांचे कंबरडे यंदाही मोडले आहे.
सातारा पालिकेत साविआ आणि नविआ यांच्या माध्यमातून मनोमिलनाची सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षापासून सातारकर 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार याची वाट बघत आहेत. यासाठी एमपीजीकडून काम चालू असले तरी याचा त्रास सर्वसामान्य सातारकरांना होतो आहे. भीक नको पण कुत्रं आवरा अशी म्हणण्याची वेळ सातारकरांवर येऊन ठेपली आहे. सातत्याने शहरात खड्डे खाणले जात असून प्रत्येक पावसाळ्यात सातारकर हा तोंड दाबून बुक्याचा मार सहन करत आहे. नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी नुसते पत्रकबाजी करत असून एनजीपी हटाव रस्ते बचावचा नारा आता सातारकर देत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे डागडुजी करण्याचे काम पालिकेच्यावतीने प्रत्येक वर्षी करता येते. यावर्षी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना डबके चुकवत प्रवास करावा लागत आहे. पालिकेत विरोधक औषधालाही नसल्याने सत्ताधार्यांना जनमताचा विसर पडला आहे. हे खड्डे वेळीच भरून काढले तर ठिक अन्यथा येवू घातलेल्या निवडणुकामध्ये याच शिंतोडे उडतील. एमजीपीबरोबर शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यंदाही सातारकरांचे खड्ड्यामुळे कंबरडे मोडणार आहे.
यंदाही सातारकरांचे खड्ड्यामुळे कंबरडे मोडणार..
RELATED ARTICLES