सातारा : गेली तीस वर्षे सत्तेच्या परिघाबाहेर राहून राजकारण करणारे रासपचे महादेव जानकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. सातारा जिल्ह्यात स्वबळावर मंत्रिपद मिळविणारे सुपूत्र अशी त्यांची ओळख झाली असून या सुपुत्राला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची जोरदार मागणी जिल्ह्यातून होवू लागली आहे.
पळसावडे (ता. माण) येथील महादेव जानकर यांनी अभियंता पदविका प्राप्त केल्यानंतर मा. काशिराम यांच्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर विचारांची दिक्षा घेतली. त्या आधारावरच पुढे धनगर समाजाला संघटित करुन त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी केली. राष्ट्रवादी व काँग्रेस हे कधीही तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठे होवू देणार नाहीत, उलट सामान्यांचा पक्ष बाळसे धरु नये म्हणून रिपब्लिबन पक्षासह रासपमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही काँगे्रसने फसवणूक केल्यामुळे भाजप-सेनेच्या महायुतीत रासप सामील झाले. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नाबाबत विधानपरिषदेत जानकर यांनी आवाज उठवून दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
सातारा जिल्ह्यातील दलित, ओबीसी व बहुजन तसेच ब्राह्मण समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. जिल्ह्यात सर्वाधिक परिचित व सर्वसामान्यांना न्याय देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्रातील मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपने संधी देवून दलित, ओबीसी व सवर्ण यांना सत्तेत वाटा दिला आहे. मंत्री जानकर यांना सातारा जिल्ह्याची खडान्खडा माहिती आहे. त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री केल्यास भाजप-सेनेसह घटकपक्षांची मोट बांधण्यात ते यशस्वी ठरतील. आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायत, समिती यांच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढल्यास इतिहास घडणार आहे. त्यासाठी महादेव जानकर यांच्यासारख्या मंत्रिमहोदयांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी दलित सेनेचे प्रेमानंद जगताप, रासपचे बजरंग गावडे, वैभव गवळी, संदिप शेंडगे, बाळासाहेब जानकर, शामराव कोळपे, अॅड. मगर यांनी केली आहे.
ना. जानकर यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची जोरदार मागणी
RELATED ARTICLES