सातारा : विनयभंग व व्हाटॅस्अपवर अश्लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज सकाळी 9 वाजता आ. गोरे यांनी सातारा पोलीसांसमोर शरणापगती पत्करली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
व्हाटॅस्अपवरुन एका महिलेला अश्लील मेसेज पाठवून तसेच शरीरसंबंधाची मागणी करुन गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे आ. जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. परंतु जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्षा मोहिते यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांना अटक टाळावी यासाठी गोरे यांनी उच्च न्यायालयात अपीलासाठी जाईपर्यंत अटक करु नये याबाबतचा अर्ज केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्या. वर्षा मोहिते यांनी त्यांना 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान याबाबत काल उच्च न्यायालयाचे न्यायाधिश साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूकडून युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने सातारा पोलिसांनी दिलेला अहवाल पडताळून पाहिला. एकूण आ. गोरे यांची पार्श्वभूमी बघता साक्षीदारावर दबाव येऊ शकतो या कारणावरुन आ. गोरे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे आ. गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकत नाही.
याबाबत सातारा पोलिसांनीही फिल्डींग लावत आ. गोरे यांना अटक करण्याचा चंग बांधला होता. दरम्यान, गोरे यांनी सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्यावर शहर पोलिस ठाण्यात स्वत:च हजेरी लावली. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासमोर गोरे हजर झाले आणि अटकेची कारवाई करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा त्यांना 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.