तुळसणला ग्रामसभा ः अधिकारी व ग्रामस्थांशी संवाद
कराडः तुळसण व लगतच्या भागामध्ये पाण्यासाठी पाझर तलाव व बंधारे उभारणीसाठी वाव आहे. त्यादृष्टीने मी मुख्यमंत्री असताना काहीठिकाणी साखळी सिमेंट बंधारे उभारले आहेत. या भागात नव्याने पाझर तलाव व बंधारे झाल्यास पाण्याचा प्रश्न मिटेल, याकरिता अधिकाऱयांनी नवीन पाझर तलाव व बंधाऱयाचे प्रस्ताव तात्काळ द्यावेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. आमदार दत्तकग्राम तुळसण (ता. कराड) येथील ग्रामसभेत ते बोलत होते. सरपंच सौ. उषादेवी आत्माराम पाटील अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, आदर्श सरपंच अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात-सवादेकर, काँग्रेसचे प्रवक्ते पैलवान तानाजी चवरे, उदय पाटील-उंडाळकर, अॅड. ए. वाय. पाटील, उपसरपंच सुर्यकांत वीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. आ. चव्हाण म्हणाले, येवती धरणातील पाण्याचा कालवा तुळसणमधून गेला आहे. तरीही या गावाला गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या धरणामध्ये येथील लोकांच्या जमीनी संपादीत झाल्या आहेत. तरीही धरणामधील पाण्याचा लोकांना काहीही उपयोग होत नाही. याबाबत संबंधीत खात्याच्या अधिकाऱयांना सूचना देवू. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत गावालगत बंधारे झाले आहेत. अजूनही तलाव व बंधाऱयांसाठी नवीन प्रस्ताव द्यावेत. आ. आनंदराव पाटील म्हणाले, मी व पृथ्वीराजबाबांनी आमदार म्हणून केवळ तुळसणच दत्तक घेतलेले नाही, तर संपूर्ण कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. ती जबाबदारी पूर्णत्वाकडे जाताना तालूक्यात उभ्या राहिलेल्या कोट्यवधीच्या विकासकामांमधून आपणास दिसत आहे. लोकांनी आपल्या गावांचा विकास करण्यास कोणतीही हयगय करु नये. अधिकारी आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्याकडे नवीन कामांचे प्रस्ताव द्यावेत. ते म्हणाले, पृथ्वीराजबाबांकडे काँग्रेस पक्षातील अनेक महत्वाच्या जबाबदाऱया आहेत. तरीही ते जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. परंतु काहीकाळ ते कराडसाठी उपलब्ध नसताना त्यांची जबाबदारी माझ्याकडे राहते. आणि ती जबाबदारी मी यशस्वीपणे सांभाळत आहे. अजितराव पाटील यांचेही भाषण झाले. अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक केले. संजय माने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जयसिंगराव माने, शिवाजीराव माने, पांडूरंग यादव, दिनकर माने, आप्पासाहेब माने, माजी उपसरपंच आप्पासाहेब पाटील, गणेश यादव, सचिन सुतार, दिनकर वीर, पाचुपतेवाडीचे माजी सरपंच सर्जेराव मोरे, दादासाहेब खोत यांच्यासह विविध खात्यामधील अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळसणसाठी पाझर तलाव व बंधार्याचे प्रस्ताव द्या ः आ. पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES