सातारा : दै. पुढारीचे खटाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार स्व. अरुण देशमुख यांच्या कुटुंबियांना सुमारे 6 लाखांहून अधिक रुपयांचा कृतज्ञता निधी अर्पण करुन सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाने राज्यातील पत्रकारितेत आदर्श पायंडा घालून दिला. पत्रकारदिनाच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्या हस्ते हा निधी प्रदान करण्यात आला. राज्यातील पत्रकार संघांनी सातार्याचा आदर्श घेवून वाटचाल करावी, असे गौरवोद्गार यावेळी एस. एम. देशमुख यांनी काढले.
सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशन यांच्यावतीने क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकारदिनाचे औचित्य साधून या भावुक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, विभागीय सचिव शरद पाबळे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष सचिन जाधव, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीकांत भोई, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. सोमनाथ साबळे, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, प्रशांत पवार, श्रीकांत कात्रे व मान्यवर उपस्थित होते.
स्व. अरुण देशमुख यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता निधी उभा करण्याचा संकल्प जिल्हा पत्रकार संघाने केला होता. त्यानुसार गेले तीन – चार दिवस सातारा जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून दानशुरांनी धनादेश व रोख स्वरुपात मदत दिली. ही सगळी रक्कम सुमारे 6 लाखांहून अधिक भरली. ही रक्कम एस. एम. देशमुख यांच्या हस्ते अरुण देशमुख यांचे वडील तात्यासाहेब देशमुख व मुलगी अनुजा देशमुख यांच्याकडे प्रदान करण्यात आली. यावेळी अरुण देशमुख यांच्या पत्नी सुजाता देशमुख, बंधू तानाजी देशमुख व आई सुमन देशमुख उपस्थित होत्या. कृतज्ञता निधी अर्पण करण्याच्या क्षणी सारे सभागृह भारावून गेले. अरुण देशमुख यांच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावले. अनंत ट्रेडींग कंपनीच्यावतीनेही याचवेळी देशमुख कुटुंबियांना आटाचक्की देवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना एस. एम. देशमुख म्हणाले, स्व. अरूण देशमुख यांचा स्वभाव, लेखणी आणि संघटन याविषयी ऐकले होते. पत्रकारितेतील त्यांचे लिखाण आणि प्रश्नांना वाचा फोडण्याची पध्दत यामुळे त्यांचा राज्यस्तरावर अनेकदा गौरव झाला. त्यांचा मृत्यू काळजाला चटका लावून गेला. स्व. अरूण देशमुख यांच्या कुटूंबामागे पत्रकारांची संघटित शक्ती उभी राहिली. सातारा जिल्हा पत्रकार संघाने कृतज्ञता मदत निधीचा राबवलेला हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत आहे. पत्रकार संघांच्यावतीने अनेक कार्यक्रम राज्यात होतात. मात्र, हा एक ह्रदयस्पर्शी उपक्रम असून राज्यातील पत्रकार संघांनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे. दु:खद समयी अशी वेळ जेव्हा येते तेव्हा संघटनांमधील मतभेद विसरून एकत्र येणे हा संदेश सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी राज्याला दिला आहे. राज्यात एखाद्या पत्रकार संघाने दिवंगत पत्रकाराला श्रद्धांजली म्हणून दिलेली ही सर्वांत मोठी मदत असल्याचा उल्लेखही देशमुख यांनी केला. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुढारीफ व्यवस्थापन, विविध देणगीदार व पत्रकार संघटनांच्या दानशूर वृत्तीचे कौतुक केले. संपूर्ण राज्यात पत्रकारांच्या दुर्धर आजारांना मदत अथवा दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करता यावी म्हणून 1 कोटी रुपयांचा कॉर्पस् फंड उभा करण्याचा मनोदय असून ही प्रेरणा सातार्यापासूनच घेतली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
प्रभाकर घार्गे म्हणाले, अरुण देशमुख यांच्या जाण्याने माण-खटावची मोठी हानी झाली आहे. त्याच्या कुटूंबाला लागेल ती मदत माझ्याकडून दिली जाईल. अरूणच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारांना पुरस्कार देण्याची जिल्हा पत्रकार संघाची योजना यशस्वीपणे अंमलात आणण्यासाठी आपला पुढाकार राहील.
हरीष पाटणे म्हणाले, ग्रामीण पत्रकारितेचा दीपस्तंभ असलेल्या अरुण देशमुख यांच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी आम्ही दिलेल्या हाकेला सातारा जिल्ह्याने प्रतिसाद दिला. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी घेतली. पुढारीफ व्यवस्थापन व अजितदादांसह समाजातील विविध स्तरातील दानशुरांनी मिळून सुमारे 6 लाखांहून अधिक रक्कम विश्वासाने आमच्याकडे दिली. ही रक्कम देशमुख कुटुंबाकडे देताना पत्रकारितेतील आत्मिक समाधान लाभत आहे. शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीमार्फतही मदतीचा प्रस्ताव तयार केला असून तो शासनाकडे लवकरच पाठवत आहोत. अरुण देशमुख यांच्या स्मृतीदिनी खटाव तालुक्यात दरवर्षी आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार देण्याचेही प्रयोजन असून त्यासाठी माण-खटाव तालुक्यातील पत्रकार संघांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहनही पाटणे यांनी केले. यावेळी मदत निधी देणार्या दानशुरांची नावे वाचून पाटणे यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पत्रकारदिनाच्यानिमित्ताने सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांमधील मतभेद संपून सगळे एका छत्राखाली आले हे फार मोठे फलित आहे. भविष्यकाळातही हीच एकजूट अभेद्य ठेवून सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेची आदर्श वाटचाल मजबूत करु, असेही पाटणे म्हणाले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, अरुण देशमुख यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेची हानी झाली. त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी घेवून अरुण देशमुख यांना श्रद्धांजली वाहत आहोत.
शरद काटकर म्हणाले, एस. एम. देशमुख यांनी राज्यात पत्रकारांची मजबूत संघटना उभी केली आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकारही मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. समाजासाठी धडपडणारे पत्रकार स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच पत्रकार संघाने पुढाकार घेवून शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्याला संपूर्ण जिल्ह्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शरद पाबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रविण जाधव व विठ्ठल हेंद्रे यांनी सूत्रसंचलन केले. प्रारंभी दर्पणफकार बाळशास्त्री जांभेकर व स्व. अरुण देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष झाल्याबद्दल व हुतात्मा पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एम. देशमुख यांचा पेढ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी, तुषार भद्रे, शैलेंद्र पाटील, दत्ता मर्ढेकर, शरद महाजनी, चंद्रसेन जाधव, संदीप कुलकर्णी, शशिकांत कणसे, सौ. प्रगती पाटील, प्रदीप विधाते, डॉ. सुहास माने यांच्यासह सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन, तालुका पातळीवरील पत्रकार संघांचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार उपस्थित होते.