मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची युती होईल की माहित नाही. मात्र, या सगळ्याकडे लक्ष न देता ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्यानेच कामाला लागा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले. ते बुधवारी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचा एकुण सूर पाहता शिवसेनेशी समझोता न झाल्यास भाजप स्बळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. सध्या शिवसेना आणि भाजपची युती टिकणार की तुटणार याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष न देता स्थानिक प्रभागांवर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्याने आपली जबाबदारी पार पाडल्यास 2017 च्या निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी फडणवीस यांनी पालिकेतील शिवसेनेच्या कारभारामुळे मुंबईकरांची दुरावस्था झाल्याची टीका केली. भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत वाहतूक आणि अन्य सुविधांचे जाळे निर्माण करून मुंबईकरांचे जीवन सुखकर करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. या कार्यक्रमापूर्वी भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून मुंबई महानगरपालिकेत 114 कमळे फुलवण्याच्या घोषणा देण्यात आल्या. मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल, अशा घोषणांनीही कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सूचकपणे मौन बाळगून होते. दरम्यान, या कार्यक्रमात आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. 2016-18 या कार्यकाळासाठी शेलार यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेशी दोन हात करण्याची जबाबदारी शेलार यांच्याकडेच असेल, हेदेखील स्पष्ट झाले आहे. शेलार यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख राक्षस असा केला. या राक्षसाला टीका करून मोठे करून नये. त्याऐवजी त्याला बाटलीत बंद करा, असा शेलार यांनी कार्यकर्त्यांना दिला. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून शिवसेनेला डावलण्यात आले होते. त्यामुळे अगोदरच विळ्याभोपळ्याचे सख्य असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला होता. याचा परिपाक म्हणून शिवसेना राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई पालिकेसाठी भाजपाचा स्वबळाचा नारा
RELATED ARTICLES