सातारा, दि. 17 (जिमाका) : पत्रकारिता हे समाजातील विविध विषयांवर वाचा फोडणारे प्रभावी माध्यम असून पूर्वीही ते होते नी आज ही आहे आणि उद्याही राहणार आहे. काही वर्षात आपल्या समाजामाध्ये समाज माध्यमांचा वापर वाढला आहे हे वर्तमान पत्रांसाठी आव्हान नसून व्यवसाय वाढविण्याची एक मोठी संधी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आज केले.
जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रम आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बळीराजा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. काटकर बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, पत्रकार जीवनधर चव्हाण, सुशीत आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मागील काही वर्षापासून समाज माध्यमे हे जास्त प्रभावी ठरत चालले आहेत. वृत्तपत्र वा वृत्त वाहिन्या ऐवजी फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम या माध्यमातून व्यक्त होणे सुरू झाले आहे. त्यामुळे फार तातडीने मजकुराची देवाण-घेवाण होत आहे. टि्वट केल्यावर लागलीच जगातील कुठल्याही भागात ते पोहोचलेले असते. एवढी गतिमानता अन्य कोणत्याही प्रसिध्दी माध्यमात नाही. हे मोठे आव्हान पारंपारिक माध्यमासमोर आहेत. या आव्हानाकडे संधी म्हणून पहावे.
आजच्या आधुनिक काळातील सोशल मिडियाचे मोठे आव्हान आहे. परंतू हे माध्यमे प्रिंट मीडियाला आव्हान ठरू शकेल काय अशी चर्चा सुरू आहे. आता प्रिंट मीडिया संपणार. कालबाह्य होणार असा विचारप्रवाह देखील सुरू झाला. पण इलेक्ट्रॉनिक आणि सोशल माध्यमांचा प्रभाव जरूर वाढला, मात्र हि माध्यमे प्रिंट माध्यमाला पर्याय ठरू शकले नाहीत आणि भविष्यात ठरणार हि नाहीत, असा विश्वासही श्री. काटकर यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार जीवनधरण चव्हाण म्हणाले, प्रत्येक पत्रकाराने काळानुसार अपडेट राहणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आज विचारांची देवान-घेवाण होणार आहे. समाज माध्यमे ही प्रिंट मीडिया आवाहन नसून एक संधी म्हणून पहात आहेत. त्यानुसार प्रिंट मीडियानेही आत बदल करण्यास सुरुवात केली आहे. समाज माध्यमे ही आवाहन नसून संधी आहे याचा सर्वांनी विचार करावा, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील म्हणाले, तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुढे सुध्दा एक नवीनच आव्हान उभे राहिले आहे. प्रिंट मिडीयातील पत्रकारितेबद्दल आजही सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाची भावना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत पत्रकारितेचे अनन्यसाधारण महत्व राहिले आहे. आज जगभरतल्या नजरा भारताकडे वळल्या आहेत. माध्यमाचे सर्वात मोठे मार्केट भारतात आहे. भारतात रोज 10 कोटी वर्तमानपत्र विकली जातात. भारतातील फेसबुक युजर्स आज घडीला 20 कोटी आहेत. आता रोज 7 लाख नवीन युजर्स भारतात वाढत आहेत. वॉटस्अप वापरणाऱ्यांची संख्याही या पेक्षाही अधिक आहे. युट्यूब, इंस्ट्राग्राम, ट्वीटर वापरणाऱ्यांची जगातील सर्वाधिक संख्या भारतातील असल्यामुळे या सर्व सोशल मीडियामध्ये रेव्हन्यू जनरेट करण्याची ताकद कमालीची असल्यामुळे, वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्सनी या माध्यमाशी जूळवून घेऊन ती भाषा वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काळाशी सुसंगत राहून माध्यम हे आव्हान न समजता नवा वर्ग ग्राहक म्हणून जोडून घेत ही संधी म्हणून पाहत आहेत. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील पत्रकारांनी सोशल मीडियात अधिक पारंगत होण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार सुजीत आंबेकर व अजित जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर पत्रकार अरुण जावळे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास पत्रकार तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.