महाबळेश्वर: जिल्हयातील ग्रामिण भागातील कलाकारांना महाबळेश्वर नाटय परिषदेच्या शाखेने व्यासपीठ उपलब्ध करून आपला अभिनय सादर करण्याची संधी द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी येथे बोलताना केले. यावेळी शाखेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर हे उपस्थित होते
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे उद्घाटन अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमा ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे उपाध्यक्ष भाउसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह दिपक करंजीकर, नियामक मंडळाचे सदस्य सुनिल महाजन, महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर, उपाध्यक्ष्य संतोष शिंदे, बबनराव ढेबे, कार्यवाह संजय दस्तुरे, कोषाध्यक्ष विलास काळे, अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे, नगरसेवक रविंद्र कुंभारदरे व कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.नाटय परिषदेच्या शाखा उद्घाटना निमित्त छ शिवाजी चौकातून बाजारपेठ मार्गे निता हॉटेलच्या सभागृहापर्यंत नाटय दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीची सुरूवात छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला व भवनी मातेला पुष्पहार अर्पण करून झाली. दिंडीच्या सुरूवातीला प्राथमिक शाळा क्र 5 च्या विद्यार्थ्यांचे लेझिम व बॅण्ड पथक होते. त्यामागे पारंपारिक वेषात मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. फुलांनी सजविलेल्या पालखीत नटराज मुर्ती व विविध विषयांवरील नाटकांची पुस्तके ठेवली होती याचे पुजन मोहन जोशी यांच्या हस्ते करून दिंडीची सुरूवात करण्यात आली. काही वेळ अभिनेते मोहन जोशी यांनी पालखीचा भार वाहिला. यावेळी नाटय परीषदेचे अनेक मान्यवर पदाधिकारी स्थानिक शाखेचे पदाधिकारी दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीच्या मार्गावर रांगोळया घालण्यात आल्या होत्या. स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या स्थानिक कलाकार संत तुकाराम महाराज नटसम्राट गणपत बेलवलकर वासुदेव यांचा वेश परीधान करून दिंडीत सहभागी झाले होते. ऐतिहासिक वेशात दिंडीत सहभागी झालेला बालचमुंचा एक गट सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता. छ. शिवाजी चौकातुन बाजारपेठ मार्गे दिंडी सुभाष चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रे गार्डन बस स्थानक मार्गे निता हॉटेल येथील सभागृहात पोहचली. या ठिकाणी शाखेच्या महिला सभासदांनी पाहुण्यांचे औक्षण केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्ञात अज्ञात दिवंगत कलाकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली मान्यवरांनी दिप प्रज्वलन व नटराज मुर्तीचे पुजन केले जेष्ठ सदस्या रोहीणी वैद्य व त्यांच्या सहकारी महिलांनी स्वागतगीत सादर केले. नाटय परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी शाखेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. मोहन जोशी यांना यंदाचा पु. वा. भावे पुरस्कार मिळाल्या बद्द्ल महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या हस्ते मोहन जोशी यांचा शॉल श्रीफळ पुस्तके व स्मृतीचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. नाटय परीषदेचे उपाध्यक्ष भाउसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह दिपक करंजीकर यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाटय शिव प्रतिष्ठान कलाकार किसन खामकर दत्ताजी वाडकर, किरण दळवी, वेदीका ढेबे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यवाह संजय दस्तुरे यांनी प्रास्ताविक केले तर शाखेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी आपल्या भविष्यातील योजना सांगुन नाटय परिषदेच्या वतीने तीन दिवसांच्या महाबळेश्वर फेस्टीवल अथवा लावणी महोत्सव आयोजित केला जाईल असे सांगून डी. एम. बावळेकर यांनी पुढील नाटय संमेलन भविण्याची संधी महाबळेश्वरला मिळावी अशी विनंती केली व तसा प्रस्ताव बावळेकर यांनी नाटय परीषदेचे अध्यक्ष मोहन जोशी व इतर पदाधिकारी यांचेकडे सादर केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळयांचा गजर करून नाटय संमेलनच्या मागणीला दुजोरा दिला.
उद्घाटन समारंभानंतर नियामक मंडळाचे सदस्य सुनिल महाजन व नाटय परीषदेचे प्रमुख कार्यवाह दिपक करंजीकर यांनी अभिनेते मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या वाटेतील अनेक टप्पे रसिकांसमोर आपल्या खुमासदार शैलित कथन केले. याचवेळी आपण आपल्या खलनायकाच्या भुमिकेत असताना 65 पेक्षा अधिक यशस्वी बलात्कार केले आहेत, असे सांगितले तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला होता. बालपणापासून ते आत्ता पर्यंत सहाशे पेक्षा विविध भाषेतील चित्रपटात कामे केली आहेत. यापैकी अनेक चित्रपटांनी आपल्याला पुरस्कार मिळवुन दिले आहेत.
केवळ चित्रपटच नव्हेतर बालनाटय व्यवसायिक नाटके विविध मालिका यांनीही मला पारितोषिके मिळवुन दिली आहेत. यावेळी बीग बि अमिताभ बच्चन, धर्मेद्र, अजय देवगण, आशा काळे यांच्याबरोबर काम कराताना आलेले अनुभव कथन केले. चित्रपट सृष्टीत महिलांचा आदर कसा करावा हे महानायक अमिताभ यांचे कडुन शिकावा असे सांगुन त्यांनी या बाबतचे आपले अनुभव सांगितले.
या समारंभास स्थानिक शाखेचे उपाध्यक्ष संतोष शिंदे, बबनराव ढेबे, कार्यवाह संजय दस्तुरे, कोषाध्यक्ष विलास काळे, अर्बन बॅकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे, नगरसेवक रविंद्र कुंभारदरे, विमलताई पारठे, शारदा ढाणक, विमल ओंबळे, स्नेहल जंगम, युसुफ शेख बॅकेचे माजी अध्यक्ष दत्ताजी वाडकर वृषाली डोईफोडे लिलाताई शिंदे, दिपक कांदळकर, किसनराव खामकर, अभिजित खुरासणे आदींची उपस्थिती होती.