सातारा : चिंचणेर वंदन, ता. सातारा येथील नवविवाहिता खूनप्रकरणी काही जणांनी दलित वस्तीवर हल्ला करून तेथील गाड्यांची व घरांची जाळपोळ करून नासधूस केली. या प्रकरणी पोलिसांनी 33 जणांना अटक केली आहे. तर या हल्लेखोरांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 9 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नवविवाहिता खून प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ दणाणे यालाही न्यायालयात हजर केला असता त्याला दि. 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच दलितवस्तीवरील हल्ल्याप्रकरणी समाजातील सर्वच स्तरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. सातारा शहरात तसेच जिल्ह्यात तणाव निवळला असून पोलिसांनी या घटनेवर कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन केले असून जो कोणी अफवा पसरवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान मंगळवारी रात्री 10.30 चे सुमारास अचानक हल्ला करीत चिंचणेर वंदन गावातील दलित वस्ती पंचशील नगरमध्ये सुमारे 150 जणांच्या टोळक्याने हल्ला केला आणि येथील 50 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामध्ये वस्तीवरील बौध्द विहार, किरणा दुकान, जय भीम व्यायामशाळा यासह अनेक घरांचे मोठी तोडफोड करण्यात आली. घरांचे पाण्याचे पाईप लाईन, वीज मिटर, चौकटी व खिडक्या मोठे दगड टाकून फोडण्यात आले. तसेच परिसरात उभ्या असणार्या सर्व चारचाकी गाड्या तसेच दुचाकी गाड्या पेट्रोल टाकुन पेटवण्यात आल्या तसेच घरातील गृह साहित्य, दूरदर्शन संच, फ्रीज कपाटे, कॉम्प्युटर, लॅपटॉप आदी वस्तू फोडुन जाळण्यात आल्या, हा प्रकार सुमारे तासभर सुरु होता. या वस्तीवर असणारे घरातील सर्व पुरुष मंडळी ही परिनिर्वाण दिनाचे निमित्ताने मुंबई येथील चैत्यभूमीवर गेली होती. त्यामुळे घरात प्रतिकार करण्यासाठी कोणीच नव्हते. याचा गैरफायदा घेत केवळ महिला व लहानग्यानंा भिती दाखवत हा प्रकार करण्यात आला. तसेच गृहसाहित्य त्या त्या घरापुढेंच पेटवुन देण्यात आले. पहाटे गावातील युवकांने फोन केल्यावर पोलीसानंा ही माहीती कळताच पोलीस तातडीने तेथे हजर होे परिस्थिती नियंत्रणा खाली आणली.
दरम्यान, रात्री घडलेला हा प्रकार सातारा येथे समजताच आज पहाटे मध्यवर्ती बसस्थानकावर काही संघटनांच्या वतीने बसेस जा ये करण्यास मज्जाव करत बंद पुकारला, आणि त्याचे लोण हे सातारा शहरात पसरले. सकाळी 10 चे सुमारास अनेक दलित संघटनांचे पदाधिकारी व कायर्ंकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ जमा होऊन त्यानी धाव पोलीस मुख्यालयावर घेतली व तेथे बैठा सत्याग्रह केला. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला तेथे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.तणावाचे वातावरण लक्षात घेउन शहरातील बस वाहतूक सकाळीच बंद करण्यात आली तसेच व्यवहार ठप्प झाले. प्रमुख बाजारपेठेतील दुकाने बंद होती. बस वाहतूक बंद झाल्याने शाळा तसे महाविद्यालयांचे कामकाज ही बंद ठेवण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत लोकांनी संयम राखून अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सोशल मिडीयावर सामाजिक तणाव निर्माण होईल अश्या पोस्ट टाकू नये असे आवाहन केले आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात सनी रामभाऊ दणाणे (वय 28, रा. पंचशील नगर चिंचणेर वंदन यांच्या फिर्यादीवरुन चिंचणेर वदन गावातील 33 व इतर ठिकाणावरुन आलेल्या 60 हल्लेखोरांवर पोलीसांनी तोडफोड, जाळपोळ व दहशत माजवणे, दलीत वस्तीवर हल्ला करुन समाज मंदिराची, बौध्द मंदिराची तोडफोड तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नवविवाहीतेच्या खुनाबाबत माहिती अशी की, चिंचणेर वंदन येथील अरुणा व त्याच गावातील सिद्धार्थ उर्फ बारक्या दणाणे यांचे दोन वर्षांपासून प्रेम सबंध होते, दोघेही भिन्न समाजातील असल्यामुळे त्यांच्या विवाहाला प्रखर विरोध होईल याची जाणीव झाल्याने मृत अरुणा हिने कोर्हाळे खुर्द ता. बारामती येथील मामाच्या मुलाशी दि. 06 ऑक्टो. रोजी पळून जावून विवाह केला होता. तरीही सबंधित नवविवाहित व माथेफिरू प्रेमिक एकमेकांच्या संपर्कात होते, दि 29 नोव्हे. रोजी कोर्हाळे खुर्द येथून अरुणा हिने मैत्रिणीला भेटण्यासाठी सातारला जाते असे पतीला सांगून ती सातारा येथे आली.
सातारा बस स्थानकात ठरल्याप्रमाणे प्रियकर सिद्धार्थ उर्फ बारक्या दणाणे याच्या मोटारसायकलवर बसून ठोसेघर येथील पवन गावच्या हद्दीत निर्जनस्थळी जाऊन त्याठिकाणी अरुणाने आणलेला जेवणाचा डब्बा खात दोघांची चर्चा सुरु झाली त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर प्रेमभंगाने संतापलेल्या सिद्धार्थ उर्फ बारक्याने सूड घेण्यासाठी सोबत आणलेल्या दांडक्याने अरुणावर हल्ला केला यावेळी डोक्याबर वर्मी घाव बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अरुणा हि मैत्रीण व चिंचणेर वंदन येथील घरी भेटण्यास न गेल्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींनी वडगाव निंबाळकर येथील पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली . यावेळी अरुणाच्या मोबाईल डिटेल्समुळे शेवटचा कॉल ट्रेस करून चिंचणेर वंदन ता.सातारा संशयित सिद्धार्थ उर्फ बारक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, पोलिसांना पाहून भयभीत झालेल्या संशयिताने अरुणाशी आपले दोन वर्षांपासून प्रेम सबंध होते तरीही तीन महिन्यांपूर्वी तिने पळून जाऊन मामाच्या मुलाबरोबर लग्न केले. म्हणून तिचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. व घटनास्थळी जाऊन अरुणाचा मृतदेह दाखवला. पोलीसांनी अरुणाचा मृतदेह हा शव विच्छेदनासाठी पुणेयेथे पाठवला आहे. नातनेवाईकांच्या इन कॅमेरा पोस्ट मार्टेम करावे या मागणीवरुन हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.