सातारा : विवाहित महिलेच्या खुनाच्या उलघडा झाल्यानंतर चिंचणेर वंदन या गावातील युवकांनी दलित वस्तीत घुसून मारामारी, गाड्या पेटवून तोडफोड करत मालमत्तेचे नुकसान केले ही घटना दुर्दैवी आहे. पोलीसांनी 31 जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. चिंचणेर वंदन गावातील परिस्थिती नियंत्रणाखाली आली असून या घटनेबाबत लोकांनी संयम राखून अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मिडीयावर सामाजिक तणाव निर्माण होईल अश्या पोस्ट टाकू नये असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख संदिप पाटील यांनी पत्रकार परीषदेत केले आहे.
पोलीस अधिक्षक संदिप पाटील माहिती देताना म्हणाले, खुनाचा उलगडा झाल्यानंतर हे वातावरण अधिक चिघळू नये यासाठी चिंचणेर वंदन गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही काही युवकांच्या जमावाने अंधाराचा फायदा घेत येथील दलित समाजाच्या वस्तीत घुसून गाड्यांची तोडफोड करत मालमत्तेचे नुकसान केले आहे. पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून याचे पडसाद अधिक उमटू नये म्हणून चिंचणेर गावात जादा पोलीसांची कुमक तैनात करण्यात आली. तसेच सातारा शहरासह जिल्ह्यातही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मारामारी, मालमत्तेचे नुकसान, जातीवाच शिवीगाळ याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ज्या लोकांनी चिथावणीखोर मेसेज सोशल मिडीयवर टाकले अशा लोकांच्यावरही पोलीस कारवाई करणार आहेत. महिलेच्या खुनाच्या घटनेतील आरोपीही पोलीसांनी अटक केलेला आहे. सोशल मिडीयावर येणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. चिंचणेर वंदन गावातील वातावरणही आता निवळले आहे. तरूणांनी भावनेच्या भरात कायदा हातात घेवून कोणतेही अनुचित प्रकार करू नये असे आवाहन संदिप पाटील यांनी यावेळी केले.
उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे म्हणाले, जमावावर अॅक्टीसिटीखाली कारवाई करण्यात आली आहे. ज्या 20 ते 25 घरांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत. अॅक्ट्रासिटीखाली गुन्ह्याअंतर्गत देण्यात येणारी मदतही दलित समाजातील कुटूंबाना तातडीने देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्वत्र शांतता रहावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. पोलीसांनी तोडफोड करणार्या युवकांच्या जमावाला अटक केली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.