मायणी : चितळी, ता. खटाव येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा चोरट्यांनी फोडून सोने व रोकड मिळून जवळपास 75 लाखांची जबरी चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली. बँकेत पोलीसांना एक सिमकार्ड सापडले असून त्यामध्ये असलेल्या छायाचित्रावरुन पोलीस विभाग संशयितांचा तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक यशवंत काळे यांनी मायणीमध्ये पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वडूजचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के व मायणीचे सपोनि रविंद्र गायकवाड उपस्थित होते.
पोलीसांनी सदर सिमकार्डवरील व्यक्तींचे फोटो प्रसिध्दीस दिले असून या व्यक्तींना जर कोणी ओळखत असतील तर त्यांनी मायणी पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र गायकवाड यांच्या मोबाईल नं. 8888804620 वर त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कलेढोण, ता. खटाव या शाखेत देखील अशाच प्रकारचा चोरीचा प्रकार घडून त्यावेळी देखील सोने व रोकड मिळून जवळपास 75 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. मात्र या घटनेस जिल्हा मध्यवर्ती बँकेने फारसे मनावर घेतले असे दिसत नाही व त्यामुळेच पुन्हा अशा प्रकारची घटना घडली. वास्तविक बँकेच्या स्ट्रॉगरुम मध्ये व सेल्फ डिपॉझिट लॉकर्समध्ये मोठ्या प्रकारच्या रकमा व ऐवज असतो असे असताना नाईट वॉचमनची नेमणूक करणे गरजेचे आहे. आज राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बंदूकधारी वॉचमन रात्रंदिवस पहारा करीत असतो. मग जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये अशा प्रकारचा वॉचमन नियुक्त करणे आवश्यक असताना याबाबतीत बँकेने डोळेझाक केली व त्याचाच परिणाम एवढ्या मोठ्या चोरीच्या घटनेत झाला. यापुढील काळात तरीजिल्हा मध्यवर्ती बँक या घटनेपासून काही तरी बोध घेऊन याबाबतीत निश्चितपणाने पाऊल टाकेल अशी अपेक्षा आहे.
वास्तविक बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर व तिजोरीवर सायरनची सोय केली असताना चोरी करताना सदर सायरन का वाजला नाही? मग असे कुचकामी सायरन शो पीस म्हणून बँकेत ठेवले जातात काय? याबाबतचा विचार देखील होणे गरजेचे आहे.
चितळीतील चोरी प्रकरणात पोलीस विभाग युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहेत. उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, वडूजचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, मायणी पोलीस स्टेशनचे गेले दोन दिवस तळ ठोकून चोरीचा तपास लावण्यात शिकस यांनी मायणी व परिसरातील अनेक गुन्ह्यात तातडीने शोध लावले आहेत. बँकेत सापडलेले सिमकार्ड तपासणीसाठी पाठवली आहेत.