सातारा/पुसेगाव : संपुर्ण खटाव तालुक्यासह जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सेवागिरी देवस्थानच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सहा जागेसाठी आज चुरशीने 5 हजार 270 म्हणजेच 77 टक्के मतदान झाले आहे. या निवडणूकीत एकुण 19 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवार दि. 24 ऑक्टोबर 16 रोजी मत मोजणी होऊन दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट जाहिर होणार आहे.
श्री सेवागिरी देवस्थानच्या ट्रस्टच्या निवडणूकीसाठी नागरिक संघटना, ग्रामविकास संघटना, जनशक्ती संघटना अशी तिरंगी लढत होत असून एक अपक्ष म्हणून निवडणूकीला सामोरे जात आहेत. सहा जागेसाठी 19 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या आठवड्या भराच्या प्रचारच्या धामधुमीनंतर रविवारी सकाळी 8 पासून सायंकाली 5 वाजेपर्यंत चुरशीने मतदान झाले. यामध्ये 4 हजार 911 एवढे मतदान झाले असून शेकडा 77 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. तिरंगी लढत असलेल्या या निवडणूकीवर खटावसह जिल्ह्याचे व राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. या निवडणूकीनंतर पुसेगाव जि.प. गटाचे राजकारण अवलंबून असल्याने पुसेगाव बरोबर भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलले आहे सत्ताधारी श्रीनागरिक संघटनेच्यावतीने विद्यमान चेअरमन डॉ.सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य रोहन पाटील, माजी चेअरमन सुनिलशेठ जाधव, माजी ग्रा.प. सदस्य संतोष तारळकर, योगेश देशमुख, शिवसेना खटाव तालुका प्रमुख प्रताप जाधव हे सहा जण रिंगणात उभे आहेत. तर ग्रामविकास संघटनेच्यावतीने विद्यमान विश्वस्त अॅड. विजयराव जाधव, माजी विश्वस्त सतीश फडतरे, माजी चेअरमन जगनशेठ जाधव, माजी विश्वस्त बजरंग देवकर, सुसेन जाधव, श्रीकांत जाधव, हे उमेदवार निवडणूकीला सामोरे जात आहेत. उपसरपंच रणधिर जाधव यांच्या नेतृत्वाखालील असणार्या जनशक्ती संघटनेच्यावतीने स्वत: रणधिर जाधव, सोपान जाधव, सुशिल मुळे, सुरेश जाधव, शिवानंद जाधव, प्रविण जाधव हे निवडणूकीला सामोरे जात आहेत. अपक्ष म्हणून मिलींद जाधव हे ही तगडे उमेदवार निवडणकीच्या रिंगणात उभे आहेत. सहा जागेसाठी 19 जण आपले नशीब अजमावत असून सकाळपासून सायंकाळपर्यंत आज चुरशीने मतदान झाले.
मोठ्या प्रमाणात पैजा
सहा उमेदवार एकाच संघटनेच्यावतीने जरी उभे असले तरी आपल्याजवळील मित्रामध्ये एका एका उमेदवारावर मोठ्या प्रमाणावर पैजा लागलेल्या आहेत.
सत्तात्तंर का? त्रिशंकू
मागील वर्षी ग्रामंपचायतीमध्ये जनशक्तीने सत्तांतर केले, त्यामुळे यावेळी देवस्थानमध्ये सत्तांतर करण्यासाठी रणधिर जाधव यांनी कंबर कसली. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार का? डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वावर मतदार विश्वास दाखवणार का? तिहेरी निवडणूकीत त्रिशंकू निकाल हाती निकाल येणार? हे पहावे लागणार आहे.