मसूर : मसूर पूर्व भागातील घोलपवाडी पाझर तलावाची पहाणी करून शिवसेना पदाधिका-यांनी पाणी टंचाई आढावा घेतला. सद्या टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न लक्षात घेवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबरोबरच मसूर पूर्व भागातील 10 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल अशी ग्वाही शिवसेना संपर्क प्रमुख नितिन बानुगडे-पाटील यांनी दिली.
मसूर भागातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी घोलपवाडी ता.कराड येथील पाझर तलावाची पहाणी केली. त्याप्रसंंगी ग्रामस्थांच्या बैठकीत प्रा.पाटील बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रामभाउ रैनाक, शिवसेना कराड उत्तर उपतालुकाप्रमुख तात्यासाहेब घाडगे, सतिश पाटील, विद्यार्थी युवासेनेचे तालुकाप्रमुख संदीप पाटील, राजेंद्र घाडगे,संजय भोसले , दत्तात्रय पवार,भरत चव्हाण,दशरथ घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रामस्थांनी पाणीटंचाईचा व शासनाचे नाकर्तेपणाचा पाडाच वाचला घोलपवाडीस प्रतिवर्षी पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावतो. शासकीय टंचाई दौरे होतात. मात्र कागदोपत्रीच पाठपुरावा होतो. गतवर्षी टँकरची मागणी असताना 15 जूनला पावसाच्या दोन दिवस अगोदर टँकर सुरू केला. घोलपवाडी पाझर तलाव नं. 1 व नं. 2 पुर्णता आटले आहेत. त्याची खोली वाढवून गळती काढण्याची तलावातील मोठमोठया टेकडया काढण्याची गरज आहे.सद्या या पाझर तलावाचे काम जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्या फंडातून सुरू असून ते दर्जेदार होत नाही. प्रतिवर्षी डागडुजी करण्यातच लाखों रूपयाचा निधी वाया जातो.तलावात पाणीसाठवण क्षमता जास्त असून केवळ दुर्लक्षीत पणामुळे पाणी साठा होत नाही.उन्हाळयात शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत असतो.मात्र त्यावर योग्य उपाययोजना केली जात नाही.केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होतो.टंचाई दौ-यातील प्रस्ताव कोठेतरी धूळखात पडलेले असतात.यापरिसरात तलावाची व बंधा-यांची कामे होणे गरजेचे आहे तसेच जलसंधारणाची कामे होण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.तसेच ब-याच वर्षापासून रखडलेली धनगरवाडी-हणबरवाडी योजना मार्गी लावल्यास मसूर पूर्व भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे त्यासाठी शासनाच्या इच्छा शक्तीची गरज आहे.
यावेळी बोलताना प्रा.नितीन बानुगडे – पाटील म्हणाले धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी तीन कोटी रूपयांचा निधी शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून ही योजना कमी खर्चात बसवून त्याखालील 10 गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आपण पाठपुरावा करू असे सांगून 2019 पर्यंत सातारा जिल्हयातील अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शिवसेना आग्रही राहणार असून या परिसरातील पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी मसूर विभागप्रमुख उध्दव घोलप, मारूती घोलप, भगवान जाधव, तानाजी घोलप, नितीन घोलप,किरण भोसले आदीशिवसैनिकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कमी खर्चात पाणीप्रश्न सुटू शकतो
धनगरवाडी-हणबरवाडी ही 28 गावांची योजना असली तरी त्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. इतर गावासांठी पाणीसाठवण्यासाठी साठवण तलाव आहे.या योजनेचे पाणी पंपहाउसने उचलून प्रत्येक गावातील साठवण तलावात सोडल्यास पूर्व भागातील 10 गावांचा पाणीप्रश्न संपुष्टात येवू शकतो त्यासाठी कोटयावधी रूपयांच्या निधीची गरज नाही तर 30 ते 35 लाखांत हा प्रश्न मिटू शकतो. असे ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिले.