औंध: अवघ्या औंध नगरीच्या जनतेच्या ह्दयात अढळ स्थान निर्माण केलेल्या गजराजाला बुधवारी सकाळी हजारो नागरिक, महिला, युवकांनी मोठ्या जनसागराच्या उपस्थितीमध्ये औंध गावातून भारावलेल्या भावपूर्ण वातावरणात, साश्रूनयनांनी भरलेल्या अंतकरणाने निरोप दिला.
दरम्यान हत्तीला नेण्यासाठी आलेल्या मथुरा येथील वाईल्डलाईफच्या गाडीमध्ये बसविण्यासाठी हत्तीला औंध ते खरशिंगे रस्त्यावरील शेतामध्ये नेले असता हजारो नागरिक, युवक, महिलांच्या उपस्थितीत वनविभाग,पोलीस विभाग, महसूल यंत्रणा कारवाई करीत असताना हत्ती त्यागाडीत चढलाच नाही सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्न करूनही हत्ती गाडीत नचढल्याने प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली तर ग्रामस्थांना सुखद धक्का बसला.
याबाबतची अधिक माहिती अशी, पेटा या संघटनेने शासनाच्या वनविभागाकडे औंधच्या गजराजाला मथुरा केअर सेंटर येथे स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. याबाबतची कारवाई मागील दोन वर्षापासून सुरू होती.एप्रिल महिन्यामध्ये वनविभाग,पशुसंवर्धन विभागामार्फत हत्तीची वैद्यकीय शारीरिक, मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याबाबतचा अहवाल शासनाकडे,संबंधित विभागाकडेसादर करण्यात आला. त्यानुसार मागील आठवड्यापासून हत्ती औंध येथून मथुरा येथे हलविण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.
पण कारवाई सुरू होताच मागील बुधवारी औंध ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढून सर्व व्यवहार बंद ठेवून आपला निषेध नोंदवला होता. त्यामुळे औंधमधील वातावरण गजराजमय झाले होते. कोणत्याही परिस्थितीत आमचा गजराज द्यावयाचा नाही हा निश्चय औंधकरवासियांनी केला होता. सोमवार दि.बारा रोजी आपल्या लाडक्या हत्तीला नेण्यासाठी गाडी येणार हे समजताच हजारो नागरिक, युवक, महिलांनी रस्त्यावर उतरून पुन्हा निषेध व्यक्त केला. गाडी येणारा मार्ग रोखून धरला. त्यावेळी तणाव निर्माण झाला होता. पण त्यादिवशी गाडी नआल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर मागील दोन दिवसांमध्ये प्रशासनाने गजराजाला हलविण्याची तयारी पूर्ण केली.
बुधवारी सकाळी नऊ वाजता हत्तीला निरोप देण्यासाठी औंध गावातून हत्तीची फेरी काढण्यात आली. यावेळी हत्तीच्या अंगावर झूल टाकण्यात आली होती. येथील ग्रामसचिवालय, बालविकास मंदिर, पद्माळे तळे, हायस्कूल चौक मार्गे राजवाडयाजवळील श्रीयमाईदेवी मंदिरात हत्तीला आणण्यात आले. त्याअगोदर ठिकठिकाणी नागरिक, महिलांनी, युवकांनी आपल्या लाडक्या गजराजाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यास फळे,विविध प्रकारचे पदार्थ खाऊ घातले.ठिकठिकाणी महिलांनी गजराजाचे औक्षण केले. यावेळी अनेक महिला, नागरिक, युवकांना आपले अश्रू अनावर झाले. हत्तीला राजवाडा पटांगणावर आणताच त्याठिकाणी त्यास संस्थानच्या परंपरेनुसार सलामी देण्यात आली. त्यानंतर गजराजाला पेठगल्ली होळीचा टेक, केदार चौक मार्गे नेण्यात आले.
यावेळी औंध पंचक्रोशीमध्ये जसजशी ही माहिती वार्यासारखी पसरत गेली तसतसी गर्दी वाढत होती.
अडीच तासाच्या ग्रामप्रदक्षिणेनंतर हत्तीला मथुरेला पाठविण्यासाठी ,गाडीत बसविण्यासाठी औंध ते खरशिंगे रस्त्यावरील एका शेतामध्ये नेण्यात आले.त्याठिकाणी गाडीचा फळका खुला करून हत्तीला गाडीत बसविण्याचे आटोकाट प्रयत्न महात, वनविभागाच्या अधिकार्यांमार्फत करण्यात येत होते. पण हत्ती काहीही केल्या गाडीत चढण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे युवक,महिलांंचा जोश चांगलाच वाढत होता. आमचा गजराज राहिलाच पाहिजे हि तळमळ त्याठिकाणी सर्वांच्या चेहर्यावर दिसत होती.
हत्ती दाद देईना हे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकार्यांनी वडूज वरून फळया आणून फळक्यावर टाकून ही हत्तीला गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला पण हत्ती मथुरा केअर सेंटरच्या गाडीत चढलाच नाही. त्यानंतर अधिकारी वर्गाने लोकांची वाढती गर्दी ,तणाव पहाता हत्तीला सरकारी मळयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने हत्तीच्या पाठिमागे जाऊ लागताच पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरसीबी फोर्सने त्यांना खरशिंगे रस्त्यावरील ओढयाजवळ अडवून धरले.
त्यानंतर हत्तीला सरकारी मळयात नेले. त्याठिकाणी मथुरा केअर सेंटरच्या गाडीत हत्तीला बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यामध्ये ही हत्ती बसत नाही हे पाहिल्यानंतर मोकळ्या ट्रकमध्ये हत्तीला बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यावेळी मात्र सायंकाळी चारच्या सुमारास हत्ती त्या ट्रक मध्ये बसताच प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा सुस्कारा
टाकला. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कारवाईला अखेर पूर्ण विराम मिळाला व अतिशय भावपूर्ण ,गदगदलेल्या वातावरणात औंधकरवासियांनी गजराजाला निरोप दिला.
गजराज ऊर्फ मोती औंध येथून मथूरेकडे रवाना झाल्याने औंधसह पंचक्रोशितील अनेक गावांमध्ये बुधवारी दिवसभर निरव शांतता पसरली होती.
यावेळी औंधसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ,तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, एकशे पन्नास पोलीस व वन विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.