साताराः वाईच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे यांनी लाच घेवून वाई शहर आणि पदच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे. त्यामुळे त्या नगराध्यक्ष पदावर काम करण्यास लायक राहिल्या नसल्याने त्यांना पदावरुन काढून टाकावे, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाईच्या नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे यांनी पालिकातर्फे बाधण्यात आलेल्या शौचालयाच्या ठेकेदारांकडून बिलाची रक्कम अदा करण्यासाठी पैशाची मागणी केली. ती लाच रक्कम 14 हजार रुपये पती सुधीर शिंदे यांच्या दवाखान्यात घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नगराध्यक्षा सौ. शिंदे यांनी अशी लज्जास्पद वर्तवणूक करुन पदास कमीपणा येईल, असे वर्तन केले आहे. यामुळे त्या नगराध्यक्ष पदावर काम करण्यास लायक न राहिल्याने त्यांना पालिकेच्या दैनंदिन कामकाजापासून दूर ठेवावे. तसेच लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत अधिकार्यांनी नगराध्यक्ष यांनी याप्रकरणात दोन नगरसेवक असल्याचे सुचित केले होते. याचा पोलीस प्रशासनाने तपास करुन शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनिल सावंत, संग्राम पवार, सीमा नायकवडी, भारत खामकर, स्मिता हगीर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, शीतल शिंदे, रेश्मा जायगुडे, विकास काटेकर, राजेश गुरव व प्रियांका डोंगरे आदी नगरसेवक उपस्थित होते.