Sunday, March 23, 2025
Homeकरमणूकहे राम, ‘नथु’रामच्या विरोधात सातार्‍यात तीव्र निदर्शने

हे राम, ‘नथु’रामच्या विरोधात सातार्‍यात तीव्र निदर्शने

 

सातारा: महात्मा गांधींच्या खुन्याचे उद्दातीकरण करणार्‍या हे राम नथूराम नाटकाला सातार्‍यात पदमश्री माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. वर्षा देशपांडे आणि महिलांसह विविध संघटनांनी बापू हम शर्मिदा है, तेरे कातिल जिंदा है च्या घोषणा देत निदर्शने करत तीव्र विरोध दर्शवला.
सातार्‍यात शाहू कलामंदिर येथे यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदर्शने सुरु असताना बराच वेळ गोंधळ उडाल्याने पोलिसांनी अखेर आंदोलकांना ताब्यात घेतले. म. गांधींच्या नावावर सत्ता भोगणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र बघ्याची भूमिका घेत आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने पोलिसांवर अतिरिक्त ताण पडला नाही.
शरद पोंक्षे निर्मित हे राम नथुराम या नाटकाचे कोल्हापूरसह अन्य भागातील प्रयोग त्याला होणार्‍या विरोधामुळे गाजत आहेत. बुधवार दि. 21 रोजी सातार्‍यातील शाहूकला मंदिर येथे नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला पदमश्री माजी आमदार लक्ष्मण माने, राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह दलित महिला विकास महामंडळाच्या शैला जाधव, माया पवार यांच्यासह महिला, विविध संघटना आणि युवक-युवतींनी तीव्र घोषणा देत निषेध नोंदवला. म. गांधी यांच्या मारेकर्‍यांचे पुरोगामी सातारा जिल्ह्यात उद्दात्तीकरण चालणार नसल्याचे आंदोलकांनी ठासून सांगितले. याचवेळी म. गांधींच्या खुन्याचे उद्दातिकरण कारणार्‍यांविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोठेही आंदोलनात नसल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या या नाटकाच्या प्रयोगाला पोलिसांकडून मोठा बंदोबस्त पुरविण्यात आला होता. यावेळी प्रेक्षक कमी आणि पोलिसच मोठ्या प्रमाणात तैनात असल्याने बघ्यांची मोठी झुंबड उडाली होती. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मनथूफ हा मारेकरी असून महात्म्याचा हत्यार्‍याचा निषेध करत निर्मात्यांचा निषेध नोंदवला. आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
म. गांधींच्या मारेकर्‍यांचा उदोउदो आणि जयजयकार करणार्‍यांना जेल, तर नथूच्या प्रयोगाला सुरक्षा देत त्या विरोधात आंदोलकांचा आवाज दाबण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप माया पवार, भारीपचे गणेश भिसे, शैला जाधव, संदीप कांबळे, रूपा मुळे, स्वाती कांबळे, राकेश कुलकर्णी आदी आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलकांशी अनेकदा पोलिसांचे खटके उडत होते. शाहूकला मंदिर येथील प्रयोग पार पडल्यानंतर पोंक्षे आणि कलाकारांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरक्षित स्थळी सोडल्यानंतर आंदोलकांना ओढण्यात आले.
हे हिंदुत्त्ववादी म्हणून मिरवणारे केंद्रात आणि राज्यात शासन असताना अतिरेकी शिबिर असल्यासारखे पोलीस बंदोबस्तात नाटके सादर करतात, येथेच त्यांची विकृत मनुवादी विचारसरणी पाहायला मिळते. याचवेळी गांधींच्या नावावर सत्ता भोगणार्‍यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, जनतेची फसवणूक करू नये. तसेच हे राम नथुराममचे निर्माते पोंक्षे यांनी पोलीस बंदोबस्ताविना महाराष्ट्रात प्रयोग सादर करून दाखवावा असे आवाहन अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी दिले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular